लोकसत्ता माध्यम प्रायोजक
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखविणारे ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे शनिवारी संध्याकाळी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले. १० जानेवारीपर्यंत हे महानाटय़ सुरू राहणार आहे. लोकसत्ता या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
पालिकेच्या डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात रसिकांसमोर शिवकाल उलगडणाऱ्या या महानाटय़ाच्या उद्घाटनाला महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे श्रीनिवास वीरकर, आमदार रवींद्र चव्हाण, संयोजक मंदार कर्णिक, प्रसाद महाडकर, अमरेंद्र पटवर्धन उपस्थित होते. श्रीगणेश पूजन, तुळजाभवानीची पूजा आणि समर्थांच्या पादुकांचे पूजन करून महानाटय़ाला प्रारंभ करण्यात आला.
ज्यांच्या पराक्रमामुळे आपण आज ताठ मानेने जगत आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तवदर्शी जीवनपट आपणास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे प्रत्यक्ष पाहण्यास मिळाला. हे महानाटय़ अधिकाधिक नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत पाहून एक संस्कार, आदर्श नवतरुण पिढीसमोर ठेवावा असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले.
शाहिराने महानाटय़ाच्या रंगमंचावर झेप घेतली आणि सुरू झाले महानाटय़. ‘मयूरेश शारदा रमणा’ या पोवाडय़ाने शाहिराने डफावर थाप मारून महाराजांचा जीवनपट उलगडण्यास सुरुवात केली.
शहाजी राजांची कारकीर्द, शिवबाचा जन्म, शिवाजी महाराजांच्या मोहिमा, कोकण मुलखातील विजय, अफझलखानाचा वध, औरंगजेबाच्या स्वाऱ्या, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, संभाजी राजांची कारकीर्द आणि शेवट. हे प्रयोग सादर होत असतानाच हत्ती, घोडय़ांची रपेट, मावळ्यांची तलवारबाजी या प्रसंगांना रसिकांसह बच्चेकंपनी उत्स्फूर्त दाद देत होती.