नाताळ सवलत योजनांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

मुंबई : करोनाच्या प्रतिबंधासाठी काही निर्बंध लागू असतानाही नाताळच्या खरेदीसाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील मॉलमध्ये झुंबड उडाली होती. दिवाळीपाठोपाठ नाताळच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने मॉलचालक आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान दिसत होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नाताळमध्ये ग्राहकांचा ७० ते ७५ टक्के अधिक प्रतिसाद मिळाल्याचे आणि विक्रीतही वाढ झाल्याचे काही मॉल व्यवस्थापकांनी सांगितले. बहुतांश मॉलमधील सवलत योजनांमुळे तयार कपडय़ांसह भेटवस्तूंना अधिक मागणी होती. दरम्यान, नाताळनिमित्त मॉलमधील वस्तूविक्रीत वाढ झाली असली तरी किरकोळ बाजारपेठेतील दुकानांना संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे ‘रिटेलर्स असोसिएशन’ने सांगितले.

टाळेबंदीमुळे साडेचार महिने बंद असलेले मॉल ५ ऑगस्टपासून सुरू झाले. त्यानंतरच्या दोन महिन्यांत अनेक मॉलना आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसांत करोनापूर्व काळाच्या तुलनेत सुमारे २० ते ३० टक्के  अधिक प्रतिसाद मिळाला. नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने त्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. दिवाळीत प्रतिसाद ५० टक्क्यांपर्यंत गेला आणि आता नाताळमध्ये त्यात पुन्हा मोठी वाढ झाली.

नाताळला जोडून शनिवार-रविवार आल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिक मोठय़ा संख्येने पर्यटनाला गेले होते तरीही नाताळच्या दिवशी अनेक मॉलमध्ये मोठी गर्दी झाली होती. बहुतांश मॉलमधील उपाहारगृहांमध्ये खवय्यांची गर्दी होती. काही ठिकाणी तर बसायला जागा नव्हती. त्यामुळे अनेकजण उभे राहूनच आवडीच्या पदार्थावर ताव मारताना दिसत होते.

मॉल सुरू झाल्यानंतर सर्वाधिक गर्दी नाताळच्या दिवशी झाली. ‘एण्ड ऑफ सीझन सेल’मुळे फॅशनेबल तयार कपडय़ांची चांगली विक्री झाली.

रिमा कीर्तिकर, मुख्य विपणन अधिकारी, विवियाना मॉल, ठाणे 

नाताळच्या दिवशी गेल्या वर्षीप्रमाणेच विक्रीमध्येही वाढ झाली. ग्राहकांचा प्रतिसाद ७० टक्के  मिळाला.

अनुज अरोरा, महाव्यवस्थापक,ओबेरॉय मॉल, गोरेगाव

नाताळच्या दिवशी सीवूड्स मॉलला गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ टक्के अधिक ग्राहकांनी भेट दिली. त्यामुळे विक्रीही ८० टक्के झाली.

– राहील अजणी, संचालक, सीवूड्स मॉल, नवी मुंबई</strong>