News Flash

करोनोत्तर काळात राज्यातील पर्यटन क्षेत्र विकासाला मोठा वाव – आदित्य ठाकरे

राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचेही सांगितले.

संग्रहीत

महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात खूप सुसंधी आहेत. राज्यात पर्यावरणाचे रक्षण, त्याचबरोबर उद्योगांना चालना आणि पर्यटन विकासास प्रोत्साहन देण्यात येत आहे. करोनोत्तर काळात राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव असून, त्याअनुषंगाने राज्य शासनामार्फत या क्षेत्राला चालना देण्यात येईल. या माध्यमातून राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज(शुक्रवार) सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहयोगाने राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी असलेल्या जागेवर आदरातीथ्य व्यवसायातील विविध खासगी संस्थांचा सहभाग मिळविण्याच्या दृष्टीने सुसंवादाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह येथे येथे पार पडला, यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर यांच्यासह विविध नामांकित हॉटेल व्यावसायिक प्रत्यक्ष व दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत राज्यातील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाणार –
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवान्यांची संख्या ७० वरुन १० पर्यंत कमी करण्यात आली आहे. राज्याचे कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत राज्यातील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यात पर्यटन विकासास मोठा वाव असून पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील उद्योजकांना शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.

पर्यटन वाढीसोबतच महसूल, रोजगार व उद्योजगत वाढीला चालना मिळणार – अदिती तटकरे
पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, आदरातिथ्य व्यावसायिकांना उद्योगातील सवलती, राज्यातील विविध ठिकाणे, वास्तू येथे पर्यटनासाठी केलेले सामंजस्य करार अशा अनेक महत्वाच्या भूमिका पर्यटन विभाग घेत आहे. सद्यस्थितीत पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवित आहे. यातून पर्यटकांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे राज्य पर्यटनात अव्वल असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटन वाढीसोबतच महसूल, रोजगार व उद्योजगत वाढीला चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत आणि सादरीकरणामध्ये विविध आदरातिथ्य उद्योग समुह, पर्यटन व्यावसायिक कंपन्या आदींनी सहभाग घेतला. ताज हॉटेल्स, हयात ग्रुप, इंटरकाँटीनेंटल, ओबेरॉय हॉटेल्स, क्लब महिंद्रा, फॅब हॉटेल्स, जीएचव्ही ग्रुप, आयटीसी हॉटेल्स, स्टर्लींग हॉलीडेज, टुलीप स्टार्स अँड सिल्व्हासा रिसॉर्ट, बावा ग्रुप, चॅलेट हॉटेल्स, हिल्ट ग्रुप, इनोवेस्ट हॉस्पिटॅलीटी, इंटरग्लोब हॉटेल्स, लॉर्डस् हॉटेल्स आदी विविध साधारण ५० हून अधिक नामवंत आदरातिथ्य उद्योग समुहांनी प्रत्यक्ष तसेच दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2020 8:19 pm

Web Title: great scope for development of tourism sector in the state in the post corona period aditya thackeray msr 87
Next Stories
1 चार कंपन्यांचा मालक, गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या
2 ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचा नवा विक्रम – किरीट सोमय्या
3 “पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा,” राम कदमांची भगतसिंह कोश्यारींकडे मागणी
Just Now!
X