देवनार येथील अयोग्य कचरा व्यवस्थापनाबद्दल ५ कोटींची दंड आकारणी

सचिन धानजी, मुंबई</strong>

मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग या कचराभूमींवर लावली जात असली, तरी या ठिकाणी याचे योग्य प्रकारे व्यवस्थापनच केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या कचराभूमींवर घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ची अंमलबाजवणी न केल्याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला ५ कोटींचा दंड आकारला आहे. महापालिका कचरा व्यवस्थापनाबाबत राबवीत असलेल्या योजनांची माहिती जाणून न घेता ही कारवाई केल्याने महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते.

मुंबईतील देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड या कचरा भराव भूमींवर रोज ७२०० ते ७५०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे या सर्व कचराभूमींवर कचऱ्यामुळे आग लागणे, दुर्गंधी या संदर्भातील तक्रारी राष्ट्रीय हरित लवादाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड या तीन कचराभूमींत घनकचरा व्यवस्थापन २०१६च्या नियमांचे पालन होते की नाही हे तपासण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात पाहणी केली होती. त्यात कचराभूमीत शास्त्रोक्तपणे कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. नियमांचे पालन केले जात नाही. अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडत आहे. केवळ देवनारच नव्हे तर कांजूरमार्ग आणि मुलुंड कचराभूमीवरही अशीच गंभीर परिस्थिती आहे, असा अहवाल या पथकाने दिला होता. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून सार्वजनिक आरोग्यासही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी अहवालात म्हटले होते. या अहवालानंतर राष्ट्रीय हरित लवादाने कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनाबाबत तक्रार दाखल करून घेत कारवाई केल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये या तिन्ही कचराभूमींवरील कचऱ्याच्या गैरवापराबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर हरित लवादाच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबरला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह कचराभूमीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर हरित लवादाने ५ कोटींचा दंड महापालिकेला आकारला आहे

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दंडाविरोधात महापालिका सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे स्पष्ट केले. पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. महापालिकेची बाजूच तपासणी पथकाने ऐकून घेतली नाही. त्यामुळे उपाययोजनांची माहिती देण्याची संधी दिली जावी यासाठी महापालिका अपिलात जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेच्या उपाययोजना

* मुंबईत रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग या कचराभूमींवर लावली जाते. यापैकी मुलुंड कचराभूमी बंद करून पुन्हा जमीन संपादन प्रक्रिया सुरू असून त्याला अद्यापही प्रदूषण मंडळाची परवानगी मिळालेली नाही.

* देवनार येथील कचऱ्यावर शास्त्रोक्तपण प्रक्रिया करून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची निविदेचे काम सुरू आहे.

* प्रत्येक सोसायटीला कचरा वर्गीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय कचरा वर्गीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी विकास आराखडय़ात आरक्षण टाकण्यात आली आहेत. सुका कचरा प्रक्रिया केंद्रासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात येत आहे.

* कचरा गोळा करण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे भविष्यात कचराभूमीवर कचरा न टाकता जागीच विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरू आहे.