पर्यावरण उल्लंघनाबाबत अपील दाखल

चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीपासून १०० मीटरच्या आत प्रकल्प उभारून पर्यावरण कायद्याचा भंग केल्याच्या तक्रारीविरुद्ध अनुक्रमे रुस्तमजी आणि ओमकार रिअल्टर्सविरोधातील अपील राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दाखल करून घेतले आहे. अपील वेळेत दाखल झालेले नाही तसेच अपीलकर्ते यांचा या प्रकल्पाशी काहीही संबंध नसल्याचा दावाही प्राधिकरणाने खोडून टाकला आहे. याप्रकरणी आता १६ जुलैला सुनावणी होणार आहे.

वांद्रे पूर्व येथील गांधीनगरात रुस्तमजी समूहाच्या रिसायलेन्स रिअल्टी प्रा. लि. यांच्या पुनर्विकासात २.५ इतके चटईक्षेत्रफळ अनुज्ञेय असतानाही प्रत्यक्षात ४.१४ इतके चटईक्षेत्रफळ वापरण्यात आले. एकाच अभिन्यासातील एका भूखंडावरील चटईक्षेत्रफळ दुसऱ्या भूखंडावर वापरण्यात आला असून त्यामुळे चटईक्षेत्रफळाचा प्रत्यक्षात वापर ३२ हजार ३९५ चौरस मीटरवरून ४० हजार ४८० चौरस मीटर इतका झाला आहे. भूखंड आहे तेवढाच असून सुरुवातीला घेण्यात आलेल्या पर्यावरणविषयक परवानगीनंतर सुधारित परवानगी घेण्यात आली. परंतु दिशाभूल करणारी माहिती सादर करून ही परवानगी मिळविण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्ते अनिल थरथरे यांनी केला होता.

मे. ओमकार रिअल्टी प्रा. लि.चा मालाड पूर्वेतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प तब्बल पाच किलोमीटर इतका विखुरलेला आहे. या प्रकल्पासाठी तीन इतके चटईक्षेत्रफळ लागू आहे. विकासकाने या भूखंडाचे दोन भाग करून एक झोपुवासीयांच्या पुनर्वसनासाठी तर उर्वरित खुल्या विक्रीसाठी वापरण्याचे ठरविले आहे. इतर वेळी या परिसरात फक्त एक इतके चटईक्षेत्रफळ लागू आहे.

अपीलकर्त्यांचा संबंध नाही!

दोन्ही अपीलकर्त्यांचा या प्रकल्पाशी संबंध नाही. या प्रकल्पाचा त्यांना फटका बसत नाही. थरथरे हे वांद्रे येथील अभिन्यासात अन्यत्र राहतात तर दौंडकर हे मुंबई सेंट्रल येथे मालाडपासून ४० किलोमीटरवर राहतात. त्यामुळे या दोघांना अपील करण्याचा अधिकार नाही, असे रुस्तमजी तसेच ओमकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. याशिवाय दोन्ही अपील विहित वेळेत केलेले नाही, असाही दावा करण्यात आला होता. परंतु प्राधिकरणाने हे सर्व दावे फेटाळून लावताना अपील दाखल करून घेतले आणि प्रत्येकी पाच हजार रुपये अपीलकर्त्यांना देण्याचेही आदेश दिले.