दादरच्या इंदू मिलमध्ये बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामधील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बांधकामातील अडथळा दूर झाला आहे. स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली असली तरी सीआरझेड क्षेत्रामध्ये येणाऱ्या बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्याचे बांधकाम परवानगी अभावी खोळंबले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘किनारी नियंत्रण क्षेत्रा’मध्ये (सीआरझेड) येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामासाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ला (एमएमआरडीए) ‘महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा’ने (एमसीझेडएमए) नुकतीच परवानगी दिली. स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली असली तरी सीआरझेड क्षेत्रामध्ये येणाऱ्या बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्याचे बांधकाम परवानगी अभावी खोळंबले होते. मात्र आता लेखी परवानगी प्राप्त झाल्यामुळे सीआरझेड क्षेत्रामधील बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बांधकामाला फेब्रुवारी  महिन्यापासून सुरुवात करण्यात आली. मात्र बाबासाहेबांच्या ३५० फुटी भव्य पुतळ्याचा भाग सीआरझेड क्षेत्रामध्ये मोडत होता. या क्षेत्रात बांधकाम करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने केंद्रीय किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे परवानगीचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर बांधकामाला राज्याच्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता होती. ‘एमसीझेडएमए’ सोबत झालेल्या बैठकीत सीआरझेड क्षेत्रामध्ये बांधकाम करण्यासाठी मंजुरी मिळाल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी दिली. त्यामुळे त्यासंबंधी लेखी परवानगी प्राप्त झाल्यावर सीआरझेड क्षेत्रात बांधकामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फेब्रुवारीपासून बांधकाम सुरू

सीआरझेड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या जागेच्या व्यतिरिक्त इतर जागेमध्ये ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने बांधकामाला सुरुवात केली होती. त्यामुळे काही बंधने घालून सीआरझेड क्षेत्रामध्ये बांधकामाला परवानगी दिल्याची माहिती ‘एमसीझेडएमए’मधील एका सदस्याने दिली. स्मारकाच्या बांधकामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मेसर्स शापूरजी पालनजी को. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराने फेब्रुवारी महिन्यापासून बांधकामाला सुरुवात केली आहे. यामध्ये संशोधन केंद्र, ग्रंथालय यांचा समावेश आहे. दरम्यान बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उंचीला भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green lantern of the construction of dr ambedkar monument
First published on: 24-08-2018 at 03:05 IST