पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदीलप्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीदरम्यानच्या प्रकल्पाला गती

मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, वाहतुकीला गती देण्यासाठी, तसेच इंधनबचतीच्या दृष्टीने नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक मंजुरी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अखेर गुरुवारी पालिकेला दिली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काही अटींसापेक्ष ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीदरम्यानच्या कामाला गती मिळणार आहे.

सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांमध्ये जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यामुळे नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान ३५ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. हा महत्त्वाकांक्षी मार्ग उभारण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली होती.

समुद्राच्या लाटांना बाधा निर्माण होणार नाही असे बांधकाम करावे,  खुल्या जागा उपलब्ध कराव्या, वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करावी, अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी, हरितपट्टा, उद्याने आदींसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करावी, निवासी भागांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून नॉईस बॅरिकेट बसवावे, या मार्गावर द्रव अथवा घनकचऱ्याची विल्हेवाट लावू नये, सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका (बीआरटीएस) असावी, या मार्गिकेचा वापर केवळ सार्वजनिक वाहतूक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि मदतकार्यासाठी करावी, कोणत्याही परिस्थितीत या स्वतंत्र मार्गिकेचा वापर व्यावसायिक वाहतुकीसाठी करू नये अशा अटी समितीने घातल्या आहेत.

वेळेत ७० टक्क्यांनी बचत

प्रिन्सेस ट्रीट ते कांदिवलीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी किनारी मार्ग पश्चिम आणि उत्तर अशा दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईमधील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीदरम्यान ९.९८ कि.मी. लांबीचा मार्ग उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात समुद्रामध्ये ८९ हेक्टर क्षेत्रात भरणी करण्यात येणार आहे. या टप्प्यासाठी ५३०३ कोटी रुपये खर्च येणार आहे. या मार्गामुळे प्रवासाची वेळ ७० टक्क्यांनी कमी होईल आणि ३४ टक्के इंधनाची बचत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.