दक्षिण मुंबईमधून पश्चिम उपनगरांमध्ये जलदगतीने जाता यावे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा या उद्देशाने आखलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या साधारण सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली  प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यासाठी पालिका प्रशासनाने शिक्कामोर्तब केलेल्या युशिन इंजिनीअरिंग आणि कॉर्पोरेशन – टेक – क्यूएट्रो (संयुक्त) यांना स्थायी समितीने अखेर बुधवारी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साधारण सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी या तिन्ही विभागांसाठी स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. या सल्लागारांची नियुक्ती करण्यासाठी डिसेंबर २०१६ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र निविदा प्रक्रियेला सल्लागारांकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. या सल्लागारांच्या नियुक्तीसाठी चार वेळा फेरनिविदा काढण्याची वेळ पालिकेवर ओढवली. चौथ्या वेळी युशिन इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन – टेक – क्यूएट्रो एस ए (संयुक्त उपक्रम) या कंपन्यांनी संयुक्तरीत्या निविदा सादर केली होती. या सल्लागार कंपनीच्या निविदेतील दर अधिक होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने सल्लागार कंपनीशी वाटाघाटी केल्या. वाटाघाटीअंती या कामासाठी ८२ कोटी ९२ लाख ८८ हजार १३६ रुपये देण्याचा निर्णय उभयतांमध्ये एकमताने झाला.

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीला प्रत्यक्ष कार्यस्थळाच्या परिस्थितीनुसार आराखडा, रेखाचित्रे, बाबींची तरतूद आणि तपशील यांचे पुनर्विलोकन करणे, आवश्यकतेनुसार किंवा योग्य असल्यास बदल सुचविणे, कंत्राटदाराच्या वेळापत्रकाची छाननी, वेळापत्रकात आवश्यक ते बदल करणे, कामावर देखरेख ठेवणे, बांधकाम साहित्याची चाचणी करणे,आदी विविध स्वरूपांची कामे करावी लागणार आहेत.

कामाच्या परिमाणांच्या नोंदी ठेवणे, कंत्राटदाराची उपकरणे, यंत्रसंच, यंत्रसामग्री, गृह आणि वैद्यकीय सुविधा आदी कंत्राट करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार आहेत की नाहीत याची पडताळणी करणे आदी विविध स्वरूपांची कामे करावी लागणार आहेत.

पहिल्या टप्प्याचे काम तीन विभागांत

पहिल्या टप्प्यात मरिन ड्राइव्ह उड्डाणपूल ते दक्षिणेकडील वांद्रे वरळी सेतूचे टोक अशा ९.९८ किमी, दुसऱ्या टप्प्यात उत्तरेकडील वांद्रे वरळी सेतूच्या टोकापासून कांदिवली लिंक रोडपर्यंतच्या १९.२२ किमी लांबीचा किनारी रस्ता उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क, प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस आणि बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक अशा तीन विभागांत कामे विभागण्यात आली आहेत