खासगी प्रयोगशाळांमधील चाचण्यांच्या साशंकतेमुळे पालिकेचा निर्णय

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई: खासगी प्रयोगशाळांमधील करोना चाचण्यांबाबत साशंकता निर्माण झाल्याने आता रुग्णाची चाचणी सलग एकाच प्रयोगशाळेत न करता वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहेत.

चेंबूर येथील नुकत्यात प्रसूती झालेल्या महिलेसह तीन दिवसांच्या बाळाला करोनाची लागण झाल्याचे अहवाल खासगी प्रयोगशाळेने दिला होता. परंतु कस्तुरबामध्ये या दोघांचेही अहवाल नकारात्मक आल्याने खासगी प्रयोगशाळांमधील चाचणीबाबत साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाल्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा त्याची चाचणी केली जाते. पहिली चाचणी खासगी प्रयोगशाळेत झाली असल्यास दुसरी चाचणी दुसऱ्या प्रयोगशाळेत केली जाईल. असे करून पुढील चाचण्या वेगवेगळ्या प्रयोगशाळेत केल्या जातील. त्यामुळे खरच खासगी रुग्णालयांच्या चाचण्यांमध्ये काही दोष आहे का हेही समोर येण्यास मदत होईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.

पहिल्या दिवशी करोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर सहाव्या दिवशी नकारात्मक येऊ शकते. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीनुसार तीन ते चार दिवसांत संसर्गाचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच अहवाल नकारात्मक (यांत्रिक चुकीने) येण्याची शक्यता पीसीआर यंत्रामध्ये असते. म्हणूनच रुग्णांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतर दोनदा केले जातात. सलग दोन वेळेस नकारात्मक आल्यानंतरच रुग्ण बरा झाला असे जाहीर केले जाते. शरीरातील विषाणूंचा प्रभाव (व्हायरल लोड)नेहमीचसारखा नसतो. त्यामुळे कधी कधी तो कमी झाला असेल आणि त्या वेळी चाचणी झाल्यास अहवाल नकारात्मक येण्याची शक्यता असते. कधी कधी रुग्णांचे नमुनेही योग्य रीतीने न घेतल्यास अहवाल नकारात्मक येण्याची शक्यता असल्याचे मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडचे ग्रुप अध्यक्ष डॉ. नीलेश शहा यांनी स्पष्ट केले.

टाळेबंदीमुळे अहवाल देण्यास उशीर

टाळेबंदीमुळे प्रयोगशाळेला किटचा पुरवठा होण्यास विलंब होत असल्याने काही दिवस अहवाल देण्यासाठी उशीर लागत होता. परंतु आता किट उपलब्ध झाल्याने २४ तासांत अहवाल दिले जात असल्याचे मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडने व्यक्त केले.