मुंबईत हिरवाई राहिलीच नाही, निसर्गसंपदेचं नुकसान होतंय अशा तक्रारी, प्रकरणे एरवी समोर येतच असतात. यावरून समाजात काही काळ चर्चा होते आणि मग मागेही पडते. पण निसर्ग या सगळ्यांपासून अलिप्त असतो. तो आपल्या चक्रानुसार व्यवस्थितपणे काम करतच असतो. सध्या मुंबईतील झाडांचा बहर पाहिला तर याची साक्ष पटते.

खरे तर तसा उशीरच झाला आहे. गुढीपाडवा म्हणजे वसंतात मुंबई बहरायला सुरुवात झाली. मुंबईतील शेकडो प्रकारची झाडे त्यांच्या त्यांच्या फुलांच्या गुणवैशिष्टय़ांसह गेले तीन महिने या शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. त्यात रस्त्यावर एका रांगेत उभी असणारी सोनमोहोर आघाडीवर आहेत. दिवसभर टपटप करत खाली पडणाऱ्या पिवळ्या फुलांचा गालिचाच तयार होतो रस्त्यावर. भल्या सकाळी रस्ते स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही हा गालिचा झाडताना नक्कीच वाईट वाटत असेल इतका सुंदर असतो हा गालिचा.

रस्त्यांवर पंधरा ते वीस मीटर उंचीवर अगदी पन्नास मीटर व्यासाच्या परिसरात घुमटाकार वाढणारे पर्जन्यवृक्षही याच काळात मोहोरतात. अर्थात, या झाडांच्या अगडबंब आकाराच्या मानाने त्यांची फुले अगदीच नाजूक. फिकट गुलाबी रंगाच्या बारीक रेघोटय़ा उभ्या राहिल्यासारखी. सोनमोहोरापेक्षा या झाडाची तऱ्हा अगदी विरुद्ध. सोनमोहोराच्या फुलांची मजा ही रस्त्यावर पसरलेल्या गालिचामधून येते, तर पर्जन्यवृक्षाचा बहर अनुभवण्यासाठी त्याचा घुमट वरून पाहावा लागतो. साधारण तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरच्या खिडकीत उभे राहिले की या झाडाचा घुमट दिसतो. या झाडाचे वैशिष्टय़ म्हणजे संध्याकाळ झाली की चिंचेच्या पानांसारखी असलेली याची पाने मिटू लागतात. अगदी एकमेकांना चिकटून ती माना टाकतात. फुले मात्र माना उंचावून सूर्यास्त अनुभवत असतात. दिवसभर पानांच्या पसाराच्या हरवून जाणारी गुलाबी फुले संध्याकाळी मात्र हिरव्या गालिचावर फुलल्यासारखी दिसतात.

हे दोन्ही वृक्ष परदेशी. रस्ता सौंदर्यीकरणासाठी ब्रिटिशांनी त्यांची मुंबईत रुजवात केली आणि या झाडांनीही शहराला आपले मानून इथे मुळे रुजवली. स्पॅथोडिया या लालचुटूक फुलांचा हा बहराचा काळ. पक्ष्यांच्या चोचीप्रमाणे आकार असलेल्या या फुलांच्या पाकळ्या पेन्सिलला टोक काढताना खाली पडणाऱ्या फुलांप्रमाणे करवतीच्या आकाराच्या असतात. या झाडांसोबतच अगदी देशी, महाराष्ट्राचे राज्यफूल असलेला तामणही याच काळात बहरतो. जांभळ्या-गुलाबी रंगाची पाच पाकळ्यांची तामण फुले पाहिली की त्यांना राज्यफुलांचा मान का मिळाला असेल हे वेगळे सांगण्याची गरजच लागत नाही. ही झाडे मुंबईत सर्वत्र असली तरी दक्षिण मुंबई विशेषत: फोर्ट, मंत्रालय परिसरात या झाडांची संख्या अधिक आहे किंवा या ठिकाणी ही झाडे अगदी नखशिखांत बहरलेली असल्याने सहज नजरेत येतात. चाफ्याला वर्षभर फुले येत असली तरी त्याचा बहर अनुभवावा तर तो या दिवसात. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात गच्च हिरव्या पानांवर खोचून ठेवावी अशी दिसणारी चाफ्याची फुले वाट वाकडी करून पाहावी एवढी लोभसवाणी दिसतात.

सर्व पाने गळल्यावर केवळ काटे अंगावर ठेवून उभ्या राहणाऱ्या काटेसावरालाही रूप देतात ती त्याची फुले. अर्थात, मुंबईत त्यांची संख्या कमी असल्याने पटकन ही झाडे दिसत नाहीत. मात्र गावच्या रस्त्याला लागलात की काटेसावर दिसतोच दिसतो. पानांचे जंजाळ नसल्याने फांद्यावर लागलेली फुले धावत्या गाडीतूनही चटकन ओळखता येतात. पांगाराही तसाच. गडदलाल चोचींचे पुंजके असावे अशा फुलांचा झुबका घेऊन पांगारा मुंबईत उभा होता, मात्र काही वर्षांपूर्वी लागलेल्या किडीने ही झाडे कायमची दुर्मुखली. या सर्व झाडांचा बहराचा काळ आता संपत आला असला तरी त्याच्या पाऊलखुणा शिल्लक आहेत. अर्थात, मे महिन्यावर राज्य असते ते पांगारा, गुलमोहोर व बहाव्याचे. कुंकवासारखी गडद लाल रंगाची फुले असलेला पळस आणि नाजूक लाल पाकळ्या अंगभर लपेटत वाऱ्याच्या झुळकीबरोबर झुलणारा गुलमोहोर खास मे महिन्यासाठी राखून ठेवले आहेत असे वाटावे इतपत ही झाडे लक्ष वेधून घेत असतात. पळसाला तर फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हटले जाते. जंगलात पळस फुलला की त्याच्या लालजर्द फुलांमुळे त्या भागात आग लागल्याचा भास कोणा एकाला झाला असावा. या दोन्ही झाडांची फुले लाल. मात्र सौंदर्य स्पर्धा घेतली तर विजेत्याचा मान पटकावेल तो बहावा. लाल रंगाच्या तुलनेत याची फुले हिरव्या रंगाशी फटकून वागत नसल्याने दुरून लक्षातही येत नाहीत. मात्र या झाडाचे रूप दडले आहे ते त्याच्या फुलांच्या झुंबरात. झुंबराप्रमाणे लटकणारी ही सोनपिवळ्या रंगाची फुले सूर्यप्रकाशात चमकतात तेव्हा या झाडावर नजर खिळते. अगदी हळुवार वाऱ्यालाही प्रतिसाद देत डुलणारी ही फुले लोलकाप्रमाणे वेगेवेगळ्या छटा दाखवतात.

समस्त शहरात कुठेही ही झाडे नजरेस पडतात. पण या झाडांचे एकत्रित सौंदर्य अनुभवायचे असेल तर भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई उद्यान, मलबार हिल, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि कुलाब्याचे सागर उपवन या जागा आदर्शवत ठराव्यात.

prajakta.kasale@expressindia.com