धान्यटंचाई असल्याचे सांगत अवाजवी दरवाढ

अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग बंद झालेल्या सर्वसामान्यांना आता किरकोळ बाजारातील महागाईने वेठीस धरले आहे. बाजारात धान्य आणि अन्य किराणा मालाचा तुटवडा असल्याचे सांगत किरकोळ बाजारांतील किराणा दुकानदारांनी डाळी तसेच अन्य धान्यांचे दर अवाजवी वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले नागरिक बेजार झाले आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीला २१ दिवस उलटून गेले आहेत. मात्र करोनाची धास्ती आणि घरातून बाहेर पडण्यावर सरकारने आणलेल्या र्निबधांमुळे वाहतुकीची साधने बंद आहेत. त्यामुळे गोदामांतील माल दुकानांमध्ये पोहोचण्यात अडचणी येत आहेत. परिणामी बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांतील दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. याचा फायदा अनेक दुकानदार आणि किरकोळ व्यापारी उचलत असून त्यांनी भाववाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बहुतांश वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांना परवडेनाशा झाल्या आहेत. तर काही ठिकाणी माल उपलब्ध असूनही दुकानदारांकडून टंचाई निर्माण करून त्याची चढय़ा दरात विक्री होत आहे.

टाळेबंदीपूर्वी ४० रुपयांदरम्यान असलेल्या साखरेची किरकोळ बाजारात ६० रुपयांना विक्री केली जात आहे. तर १२० ते १३० रुपये प्रति किलो असलेले शेंगदाणे १६० रुपयांवर पोहोचले आहेत. तूरडाळ ११० रुपयांवरून १५० रुपयांपर्यंत, तर मूगडाळ १०० रुपयांवरून १५० रुपयांपर्यंत महाग झाली आहे. परिणामी बाजारात जवळपास सर्वच

वस्तूंच्या किमती ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे चित्र आहे. तर करोना रुग्ण सर्वाधिक सापडलेल्या वरळीतील कोळीवाडा आणि जिजामातानगर भागात नागरिकांच्या संचारावर निर्बंध आणल्याने दुकानदारांकडून वस्तूंच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ करून त्यांची विक्री केली जात आहे. परिणामी या ठिकाणी काही वस्तूंच्या वस्तूंच्या किमतीमध्ये ५० ते ६० टक्के वाढ झाली आहे. जिजामातानगरमध्ये साखरेसाठी ७० ते ८० रुपये आकारले जात आहेत. मात्र हीच साखर वसाहतीबाहेरील दुकानांत ६० रुपयांना मिळत आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली. टाळेबंदीमुळे आधीच बेहाल झालेल्या ग्राहकांमध्ये यामुळे असंतोष वाढत आहे.

यात कहर म्हणजे कंपनीत उत्पादित होणारे विक्री मूल्य लिहून येणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठीही ग्राहकांना जास्त किंमत चुकवावी लागत आहे. बिस्किटे, मॅगी, पास्ता आदी नाश्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्येही विक्री मूल्यापेक्षा २ ते ५ रुपयांची वाढ करून विक्री केली जात आहे. पाच रुपयांच्या पारले बिस्किट पुडय़ासाठी दुकानदार सात रुपये आकारत आहेत. तर ३० रुपयांच्या बिस्किट पुडय़ाची ३५ रुपयांना विक्री करीत आहेत. त्याचबरोबर १२ रुपयांना मिळणारा मॅगीचा पुडा १५ ते १७ रुपयांना विकला जात आहे.

किराणा मालाचे नाव     आधीचे दर            सध्याचे दर

तुर डाळ                    १०० ते १२०                १५०

मुग डाळ                    ९६                            १४० ते १५०

मसुर डाळ                   १००                         १२०

शेंगदाणे                      १२०                         १६०

सफेद वाटाणे                 ९०                         १२०

छोले                             १००                       १२०

शाबुदाणा                     ८०                          १००

रवा                             ४५                           ६०

गुळ                             ६५                          ८०

साखर                          ४०                         ६०

पोहे                             ४८                         ६०

(दर रुपये प्रति किलो)