राज्यात विधान परिषदेची आमदारकी मिळाली नसली तरी मंत्रिपद नक्की मिळणार आहे, असे सत्तेचे गाजर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दाखविल्यानंतरही पक्षात धुसफूस सुरूच आहे. विशेषत: सत्ता स्पर्धेतून पक्षातील गटबाजी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. पक्षाचे माजी आमदार अनिल गोंडाणे यांनी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तर पक्षनेतृत्वाच्या भूमिकेला विरोध करीत विदर्भ विभागीय महासचिव अशोक मेश्राम यांनी राजीनामा दिला आहे.
आठवले यांनी २०११ मध्ये शिवसेना-भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळी पक्षात दोन गट पडले. ज्यांना भाजप-शिवसेनेशी समझोता मान्य नव्हता, अशा काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा आश्रय घेतला. काही पदाधिकारी तटस्थ राहिले. पुढे विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेबरोबर जायचे की भाजपबरोबर, या वादातून अर्जुन डांगळे यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही पक्षातून बाहेर पडले. त्याची तमा न बाळगता आठवले यांनी भाजपला निवडणुकीत साथ दिली. भाजपने मात्र गेल्या दोन वर्षांत केंद्रातील व राज्यातील सत्तेत सहभाग देण्याचे आश्वासन पाळले नाही, म्हणून आठवलेही नाराज होते. परंतु प्रत्यक्ष विधान परिषदेची एक आमदारकी देऊ केल्यानंतर, आठवले यांच्या केंद्रातील मंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित करून राज्यात मिळणाऱ्या सत्तेतील सहभागापासून दूर राहण्याची भूमिका घेतल्यामुळे पदाधिकाऱ्यांमधून उघड नाराजी व्यक्त केली जाऊ लागली. त्यानंतर आठवले यांनी राज्यात पक्षाला मंत्रिपद मिळणार आहे, असे जाहीर करून कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागपूरमध्ये थुलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2016 12:16 am