महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षातील गटबाजी आणि नेतृत्व संघर्षांची लागण बसपलाही झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांच्या बंडाच्या पवित्र्याने बसपमध्येही गटबाजीची लागण लागल्याची चिन्हे आहेत. माने यांच्या भूमिकेचे समर्थन करणारे कार्यकर्तेही आता उघडपणे पुढे येऊ लागले आहेत. तर माने यांच्या नाराजीचा पक्षसंघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केला आहे.
 शिस्तबद्ध पद्धतीने बसपची बांधणी केली गेली. कार्यकर्ते प्रशिक्षित केले. मतदारसंघ बांधले गेले नाहीत, तरीही बसपचा म्हणून एक मतदारवर्ग तयार करण्यात आला. मात्र आता बसपमध्ये गटबाजी सुरू झाली आहे.   
सुरेश माने यांच्याकडील महाराष्ट्राची जबाबदारी काढल्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यांनी इतर राज्यांच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मायावती यांना केली आहे.  मात्र प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांना, माने यांच्या नाराजीचा पक्षाच्या ऐक्यावर काही परिणाम होणार नाही, असे वाटते. इतकेच नव्हे तर, मायावती यांनी माने यांचे ११ एप्रिलच्या बैठकीतच महाराष्ट्र व तेलंगणाचे प्रभारीपद काढून घेऊन आंध्र व केरळ राज्यांच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे, असा दावा गरुड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.