मराठी चित्रपटांना परदेशांतही वाढती मागणी

दुबई, मस्कत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, कॅनडा पाठोपाठ रशियातही मराठी चित्रपटांनी आपला झेंडा रोवला आहे. या निमित्ताने जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात प्रदर्शित होणारा ‘काळ’ हा चित्रपट प्रथमच रशियात प्रदर्शित होत आहे.

शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात स्थलांतरित होणाऱ्या मराठी भाषकांची संख्या जास्त असल्याने परदेशातील मराठी टक्का वाढतो आहे. तेथील प्रेक्षकांसाठी अनेक मराठी चित्रपटांचे खेळ परदेशात होतात.   याआधी ‘सैराट’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘आनंदी गोपाळ’, ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘धुरळा’ हे चित्रपट परदेशांतही प्रदर्शित झाले आहेत. नवीन वर्षांत डी संदीप दिग्दर्शित ‘काळ ’ हा मराठी भयपट रशियात प्रथमच प्रदर्शित होणार आहे.

सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे यांच्यासह अनेक कलाकारांची भूमिका असलेला ‘काळ’ २४ जानेवारीला राज्यभरात प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर मॉस्कोत होणाऱ्या बॉलिवूड चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर होईल. हा चित्रपट रशियातील ३० शहरांतील १०० चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाईल. चित्रपटाला ‘रशियन सबटायटल’ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

‘रशियात प्रदर्शित होणारा ‘काळ’ हा पहिलाच चित्रपट आहे, असे दिग्दर्शक डी संदीप यांनी सांगितले. नुकताच आलेला ‘धुरळा’ही परदेशात प्रदर्शित झाला होता. ‘परदेशात पूर्वीपेक्षा आता मराठी चित्रपट जास्त पाहिले जात आहेत. मी दिग्दर्शित केलेला ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट अनेक देशांत प्रदर्शित झाला होता. परंतु यामुळे परदेशांत मराठी चित्रपट प्रदर्शित होणे हा एक कल सुरू झाला आहे, ’ असे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सांगितले.

परदेशी वितरणाची प्रक्रिया

जास्तीत जास्त मराठी प्रेक्षक असलेल्या देशांची निवड केली जाते. आखाती देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि कॅनडा येथे मराठी प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. तेथे सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मराठी चित्रपटांचे खेळ लावले जातात. मागणीनुसार त्यांची संख्या वाढवली जाते.