रसिका मुळ्ये

देशातील विद्यार्थ्यांचा अमेरिका ओढा आटला

भारतातून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडील ओढा काहीसा घटला असून त्याचवेळी अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे.

अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेपाच टक्क्यांनी वाढली असली तरी पाच वर्षांतील वाढीची तुलना करता यंदा कमी विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

तांत्रिक अभ्यासक्रम, व्यवस्थापन या अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी अमेरिकेची वाट धरतात. आजमितीला अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही दीड लाखांपेक्षा अधिक आहे. तिथे शिकणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण १८ टक्के असून परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेली पाच वर्षे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची एकूण संख्या दरवर्षी वाढते आहे. असे असले तरीही वाढीचा दर मात्र कमी होऊ लागला आहे. गेली तीन वर्षे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत २० ते ३० हजारांची वाढ होत होती. यंदा मात्र दहा हजार विद्यार्थीच वाढल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन या संस्थेकडून जाहीर केल्या जाणाऱ्या ‘ओपन डोअर्स’ या अहवालानुसार ही बाब समोर आली आहे.

यंदा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ९६ हजार २७१ आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत संख्येत ५.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १ लाख ८६ हजार २६७ भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होते. मात्र गेल्यावर्षीचा वाढीचा दर हा १२.३ टक्के होता. गेल्या पाच वर्षांत आदल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्येच्या वाढीचा सर्वाधिक दर हा २०१४ -१५ मध्ये नोंदवण्यात आला असून तो २९.४ टक्के होता. दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदा प्रसिद्ध झालेल्या अहवालात ऑक्टोबर २०१८ पर्यंत झालेले प्रवेश ग्राह्य़ धरण्यात आले आहेत.

बदललेला प्रवाह..

अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. यंदा भारतातील अमेरिकी विद्यार्थ्यांची संख्या ही ४ हजार ७०४ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्येत १२.५ टक्क्यांनी वाढली आहे. सामाजिक शास्त्रे, भारतीय कला, भारतीय संस्कृती, बुद्धिस्ट स्टडीज या विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे प्राधान्य असल्याचे दिसते. येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आशियाई आफ्रिकी  वंशाचे आणि अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

बदललेली धोरणे, वाढलेले दर कारणीभूत?

भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेत शिक्षण घेण्याचे वेड गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र गेली दोन वर्षे व्हिसा देण्याच्या धोरणात अमेरिकी सरकारकडून मोठय़ा प्रमाणात बदल झाले. व्हिसाबाबतचे नियम काहीसे क्लिष्ट झाले. त्याचप्रमाणे शिक्षणानंतर अमेरिकेत काम करण्याचा परवाना मिळण्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली. यंदा अमेरिकेतील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाच्या तोंडावरच डॉलर्सचे भाव मोठय़ा प्रमाणावर वाढले. त्यामुळे भारतीय रुपयांमध्ये अमेरिकेतील शिक्षण महागले. या सगळ्याचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर झाल्याचे दिसत असल्याचे मत अभ्यासकांकडून नोंदवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान तसेच काही विषयांसाठी कोरिया येथील विद्यापीठांचाही दबदबा वाढला आहे. या देशांच्या रुपाने विद्यार्थ्यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांचाही विचार करत असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे.

ओपन डोअर्स अहवाल काय आहे?

ओपन डोअर्स अहवाल हा इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन (आयआयई) या संस्थेकडून जाहीर केला जातो. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या, स्थिती दर्शवणारा हा अहवाल असून तो १९१९ पासून प्रसिद्ध करण्यात येतो. आयआयई ही अमेरिकेतील स्वयंसेवी संस्था आहे. अमेरिकेच्या शिक्षण आणि सास्कृतिक विभाग १९७२ पासून या प्रकल्पाचा भागिदार असून हा अहवाल अधिकृत मानण्यात येतो.