11 August 2020

News Flash

पोलीस दलातील संसर्गात घट

प्रशासकीय विभागाचा दावा

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रशासकीय विभागाचा दावा

मुंबई : गेल्या काही आठवडय़ांत पोलीस दलातील करोना संक्रमणाचा दर (ग्रोथ रेट) वेगाने घटला आहे. हा दर १३०० वरून २४ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, पुढील  आठवडय़ात बाधितांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असेल, असा अंदाज मुंबई पोलीस दलाच्या प्रशासकीय विभागाने केला.

गेल्या तीन महिन्यांत पोलीस दलात पसरलेला संसर्ग, मृत्यू झालेल्यांसह करोनावर मात करणाऱ्यांचा वयोगट, पूर्वीचे आजार, संसर्ग होण्याचे ठिकाण, शहरातील विविध भागांमधील तुलनात्मक आकडेवारी आदींचे विश्लेषण करून प्रशासकीय विभागाने तयार केलेल्या तपशीलवार अहवालातून ही बाब समोर आली आहे.

अहवालानुसार देशात २.९७, राज्यात ४.४९, मुंबईत ५.८४ मृत्यूदर आहे. मुंबई पोलीस दलात १ जुलैपर्यंत २८२१ अधिकारी, अंमलदार बाधीत झाले. २,२२२ जणांनी करोनावर मात केली. तर ३८ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १.३४ इतका नोंदवण्यात आला.

पहिल्या आठवडय़ात पोलीस दलातील तिघांना संसर्ग झाला. बाधितांची संख्या १३व्या आठवडय़ात २८२१पर्यंत पोहोचली. पाचव्या ते नवव्या आठवडय़ात १५२५ पोलीस बाधीत झाले. मात्र त्यानंतर बाधा होण्याचे प्रमाण कमी झाले आणि करोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत गेली. त्यामुळे रुग्णवाढीचा दर (२४ टक्के) वेगाने खाली आला, असे या विश्लेषणात नमूद आहे. १५व्या आठवडय़ात हा दर १० टक्क्यांवर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला.

पोलीस दलात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३१ जण पन्नाशी उलटलेले होते. लागण झालेले सर्वाधिक ३१ ते ४० या वयोगटातील आहेत. या विश्लेषणानुसार २०-३० वयोगटातील ७७५, ३१-४०वयोटातील ९३०, ४० ते ५० वयोगटातील ६१२ तर पन्नाशीपुढील ४८० अधिकारी, अंमलदार करोनाबाधीत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस दलाचा सशस्त्र विभाग सर्वाधिक प्रभावित आहे. या विभागात ७८५, पश्चिम प्रादेशिक विभागात ३७२, दक्षिण विभागात ३४१, धारावी-वरळी कोळीवाडा या सर्वात प्रभावित वस्त्या मोडणारा मध्य प्रादेशिक विभागात ३२३ तर नव्याने टाळेबंदी जारी करण्यात आलेल्या दहिसर, बोरिवली, कांदिवली ही उपनगरे मोडणाऱ्या उत्तर प्रादेशिक विभागातील २११ पोलिसांना करोनाची लागण झाली.

नियोजन असे..

धोकादायक वयोगटातील (५० वर्षांहून अधिक) अंमलदारांना घरी राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाधीत, संपर्कात आलेल्यांना रुग्णालय/विलगीकरणात राहावे लागल्याने मनुष्यबळ कमी पडत होते. ती तूट भरण्यासाठी सशस्त्र विभागातील तरुण अंमलदारांना करोनाविरोधातील लढय़ात पहिल्या फळीत उतरवले. अन्य आजार नसल्याने बाधा झालीच तरी ते संसर्गावर मात करतील, हा विश्वास होता. त्यामुळे या विभागातील बाधीतांची संख्या जास्त आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. बाधा आणि मृत्यू वाढू लागल्यानंतर पोलिसांनी स्वत:हूनच काळजी घेण्यास सुरूवात के ली. पाठोपाठ स्वतंत्र/विशेष रुग्णालये, हेल्पलाईन, रुग्णवाहिकांसह अन्य उपायोजना करून बाधीत पोलिसांना वेळीच उपचार मिळतील, अशी तजवीज करण्यात आली. परिणामी बाधावाढीचा दर मंदावला, असेही बजाज यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 4:54 am

Web Title: growth rate of coronavirus infection in the police force declined rapidly zws 70
Next Stories
1 रेमडेसिविर आणि टोसीलीझुमॅब वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे
2 Coronavirus : राज्यातील रुग्णसंख्या अडीच लाखांवर
3 अमिताभ बच्चन यांचे चारही बंगले टाळेबंद
Just Now!
X