‘जीएसबी सेवा मंडळा’ची राज्य शासनाकडे मागणी

मुंबई : किंग्ज सर्कल येथील ‘जीएसबी सेवा मंडळ’ अजूनही मूर्तीच्या १४ फू ट उंचीबाबत ठाम असून उंची कमी केल्यास लहान मूर्तीला मोठे दागिने कसे घालायचे, असा प्रश्न उपस्थित करत मंडळाने १४ फु टी मूर्तीला परवानगी देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

जीएसबी सेवा मंडळाच्या गणेश मूर्तीला सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी मढवले जाते. मूळ मूर्तीची उंची सव्वा अकरा फू ट असते. मुकूट घातल्यावर ती १४ फू ट होते. मूर्तीची उंची कमी केली तर तिला अलंकार घालता येणार नाहीत, असे मंडळाचे विश्वस्त अमित पै यांनी सांगितले. उंच मूर्तीला परवानगी मिळाल्यास करोनासंदर्भात सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन मंडळाने दिले आहे.

जीएसबी गणेशोत्सवाचे यंदा ६७ वे वर्ष आहे. येथे दरवर्षी शाडू मातीची मूर्ती मंडपातच घडवली जाते. त्यामुळे आगमन सोहळा होत नाही. त्यानुसार यंदाही मूर्ती मंडपातच घडवली जाईल. ७० हजार चौरस मीटरच्या मैदानात फक्त २०० ते २५० कार्यकर्त्यांनाच प्रवेश दिला जाईल. त्यामुळे सामाजिक अंतराचा नियम पाळला जाईल, भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय के ली जाईल. विसर्जन समुद्रात न करता कृत्रिम तलावात केले जाईल. त्याचे पाणी मैदानासाठी वापरले जाईल. विरघळलेली मातीही अन्य बांधकामांसाठी वापरली जाईल. तसेच मंडळाच्या नोंदणीकृत देणगीदारांच्या कुटुंबीयांना गरज असल्यास आर्थिक सहाय्य केले जाईल, असेही अमित पै यांनी सांगितले.

‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चीही यंदा प्रतिष्ठापना नाही

‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’पाठोपाठ ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या ‘चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने’ही करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मंडळाने कार्यालयात असलेल्या देव्हाऱ्यातील चांदीची गणेशमूर्ती पूजण्याचे ठरविले आहे. याही मंडळाची उत्सव आणि पूजेची मूर्ती एक आहे. आगमन सोहळा, पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचे मंडळाने आधीच जाहीर केले होते, असे मंडळाचे अध्यक्ष सीताराम नाईक यांनी सांगितले. तसेच हे वर्ष ‘जनआरोग्य वर्ष’ म्हणून साजरे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.