९९ टक्के वस्तू १८ टक्के करपरिघात आणण्याची मोदी यांची घोषणा

वस्तू आणि सेवाकराचे (जीएसटी) सुसूत्रीकरण करण्यात येत असून तब्बल ९९ टक्के वस्तू या १८ टक्के आणि त्यापेक्षा कमी कराच्या कक्षेत येतील,  अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात येथे केली. पाच राज्यांतील अपयशाची किनार आणि पुढील वर्षी येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही घोषणा करून विरोधकांवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वसामान्य जनतेला लागणाऱ्या बहुतांश वस्तू या १८ टक्के कराच्या परिघात आणल्या जातील आणि महागडय़ा मोटारगाडय़ा, उंची मद्य अशा केवळ एक टक्के गोष्टींवर २८ टक्के कर राहील, असे मोदी म्हणाले. या निर्णयाने उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी मुंबईतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीबद्दल शोक व्यक्त केला. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

आमचे सरकार येण्यापूर्वी अनेक मोठय़ा कंपन्या बँकांकडून शेकडो-हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन दिवाळखोरी जाहीर करून कर्ज बुडवत होत्या. आता ‘इन्सॉलव्हन्सी अँड बँकरप्टसी’ (दिवाळखोरी) या संहितेतच आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. २०१६ पासून आजारी कंपन्यांनी स्वत:हून कर्ज परत केले. आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख कोटी रुपयांचे कर्ज कंपन्यांनी स्वत:हून फेडले आहे. पैसे बुडवून पलायन करणाऱ्यांना जगातील कोणत्याही कोपऱ्यातून पकडून आणण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत, असेही मोदी म्हणाले.

केंद्र सरकारच्या प्रभावी विविध विकासात्मक कामामुळे देश लवकरच पाच लाख कोटी डॉलरच्या (५ ट्रिलियन डॉलर) अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. व्यवसाय सुलभतेमध्ये देशाने आपले मानांकन सुधारले आहे. १७०व्या क्रमांकावरून देश ७७व्या क्रमांकावर पोहोचला आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

पूर्वी देशातील केवळ ४० टक्के भाग स्वच्छता अभियानात सहभागी होता. आता सुमारे ९७ टक्के परिसर स्वच्छ झाला आहे. देशातील सुमारे ५० टक्के लोकांकडे बँक खाती नव्हती. आता देशातील प्रत्येक परिवार बँकिंग क्षेत्राशी संलग्न झाला आहे. रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक या सगळ्या क्षेत्रांत वेगाने कामे होत आहेत. शंभर नवे विमानतळ आणि हेलिपॅड तयार होत आहेत. ३० वर्षांपासून अडकलेली कामे मार्गी लागली आहेत. देशात रस्ते, मेट्रो, उड्डाणपुलांच्या माध्यमातून नवा भारत निर्माण होत आहे, असे उद्गार मोदी यांनी काढले.