मुंबई : राज्यातही दिवाळीच्या तोंडावर जीएसटी महसुलात वाढ झाल्याने महसूल टंचाईचा अंधार संपण्याची आशा आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये जीएसटी महसूल २,२०० कोटी रुपयांनी वाढून तो १५,७९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

करोना संकटामुळे आलेली मरगळ झटकू न अर्थव्यवस्था रूळावर येत असून देशातील जीएसटीच्या महसुलाने सीमोल्लंघन करत एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला असताना राज्यातही आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

करोनाच्या टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने अर्थचक्र रुतले होते. जून २०२० पासून टाळेबंदीत शिथिलीकरण सुरू झाले तरी पुरेशा वेगाने अर्थचक्र फिरत नव्हते. त्यामुळे जीएसटीचा महसूल बुडत होता. एप्रिल ते सप्टेंबर २०२० या पहिल्या सहामाहीतील जीएसटीची तूट ३१ हजार कोटी रुपयांवर पोहोचली होती. केंद्राने केवळ तीन हजार कोटींची भरपाई दिल्याने जीसएसटी नुकसानभरपाईची राज्याची केंद्र सरकारकडे असलेली थकबाकी २८ हजार कोटी रुपयांवर पोहोचली होती.

करोनाच्या टाळेबंदीनंतर देशाच्या जीएसटी महसुलाने ऑक्टोबरमध्ये प्रथमच एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला. देशातील एक मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्राने त्यात १५ हजार ७९९ कोटी रुपयांचे भरीव योगदान दिले आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये १५ हजार १०९ कोटी रुपयांचा जीएसटी राज्यात जमा झाला होता. त्या तुलनेत करोनाचे सावट कायम असतानाही यंदाच्या ऑक्टोबरमध्ये जवळपास ६९० कोटी रुपयांचा महसूल वाढला. तर करोना काळाचा विचार करता राज्यातील जीएसटी महसूल सप्टेंबरमध्ये १३ हजार ५४६ कोटी रुपये होता. आता ऑक्टोबरमध्ये त्यात २२०० कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

जीएसटीमधील केंद्राचा वाटा, अधिभार आदी वजा जाता राज्याच्या तिजोरीत ऑक्टोबरमध्ये ६,६०० कोटींची भर पडली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा ५,७९२ कोटी रुपये होते. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये राज्याच्या तिजोरीत जीएसटीचा महसूल  ८०० कोटी रुपयांनी वाढला.

राज्यात जीएसटीबरोबरच पेट्रोलियम पदार्थ आणि मद्यावर मूल्यवर्धित कर आकारला जातो. त्याचीही आता परिस्थिती सुधारली आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोलियम आणि मद्यावरील मूल्यवर्धित करातून २७६६ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळाला होता. ऑक्टोबरमध्ये त्यात २३४ कोटी रुपयांची वाढ होऊन तो जवळपास ३ हजार कोटींवर पोहोचला.

मंदीचा काळोख सरू लागला..

दसऱ्याचा मुहूर्त साधत लोकांनी पुन्हा हळूहळू खरेदी-अर्थव्यवहारांना गती दिल्यानेच जीएसटीने हे सीमोल्लंघन के ले असून आता नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा मुहूर्त बाजारपेठेतील मंदीचा काळोख आणखी दूर करेल, अशी आशा आहे.