पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलचा गार्ड डब्यांचे दरवाजे उघडण्यास विसरल्याने प्रवाशांना पुढच्या स्थानकात उतरावे लागले.  वांद्रे स्थानकात  सोमवारी हा प्रकार घडला. रेल्वेने या गार्डवर कारवाई केली आहे.

विरारहून दुपारी १.१८ वाजता चर्चगेटकडे निघालेली जलद वातानुकूलित लोकल दुपारी २.१९ च्या सुमारास वांद्रे स्थानकात आली. परंतु डब्यांचे दरवाजे उघडलेच नाहीत. काही सेकंदातच लोकल पुढे रवाना झाली. त्यामुळे वांद्रे स्थानकात उतरण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि त्या स्थानकातून लोकल पकडणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

लोकल दादर स्थानकात येताच डब्यांचे दरवाजे उघडले.  काही प्रवाशांनी ही माहिती ट्विट करून रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडझाप करणारी यंत्रणा  शेवटच्या डब्यातील गार्ड हाताळतो,  मात्र वांद्रे स्थानकात आल्यानंतर त्याला या कामाचा विसर पडला आणि लोकल काही सेकंद थांबून पुढे रवाना झाली, असे निष्पन्न झाले.

या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांना विचारले असता, गार्डला समज दिली असून कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बिघाड पाचवीलाच..

पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. तेव्हापासून वातानुकूलित यंत्रणा बिघडणे, दरवाजांची उघडझाप न होणे असे अनेक मनस्ताप प्रवाशांना सोसावे लागले. आजही तेच सुरू आहे.