08 July 2020

News Flash

गुढीपाडव्यानिमित्त खरेदीला जोर!

स्थावर मालमत्ता क्षेत्रात तयार प्रकल्पांचा अधिक प्रसार गुढीपाडव्याच्या निमित्ताने केला गेला.

वाहन खरेदी

हिंदू नववर्षांरंभ करताना राज्यभरातील खरेदीदारांनी उपलब्ध सूट, सवलतींचा पुरेपूर उपयोग करून घेतला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने, घर, वाहनांची खरेदी पुन्हा एकदा सणप्रेमींकरिता पर्वणी ठरली, तर निश्चलनीकरणानंतरची नामी संधी मानून विक्रेतेही आर्थिक मंदीचे तुणतुणे सोडून उत्साहाने स्वागतसज्ज झालेले दिसले.

नोव्हेंबर-डिसेंबरमधील निश्चलनीकरणानंतर यंदाचा गुढीपाडवा खरेदी-विक्री व्यवहाराला आणि एकूणच बाजाराला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारा  ठरला.  खरेदीची संधी असलेल्या गेल्या वर्षीच्या पाडव्यावर महाराष्ट्रात दुष्काळ तसेच देशपातळीवर उत्पादन शुल्कवाढीच्या निषेधार्थ बंद असलेल्या बाजाराची गडद छाया होती. यंदा मात्र, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यालाही तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या आतच असलेल्या दरांमुळे सोन्याचे वळे, नाणे तसेच दागिने खरेदीसाठी विशेषत: मंगळवारी सायंकाळी लक्षणीय गर्दी सराफपेढय़ांमध्ये दिसली. नोटाबंदीनंतर आता सुरळीत उपलब्ध होत असलेल्या चलनामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातूनही सोने धातू मागणी वाढल्याचे निरीक्षण पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वायदा बाजारतज्ज्ञ अमित मोडक यांनी नोंदविले.  रोकडरहित व्यवहारांच्या दृष्टीने सरकारने केलेल्या उपाययोजनांनाही खरेदीदार प्रोत्साहन देत असल्याचे नमूद करीत हे प्रमाण यंदा लक्षणीय वाढल्याचे विक्रीप्रमुख सतीश कुबेर यांनी सांगितले.

स्थावर मालमत्ता क्षेत्रात तयार प्रकल्पांचा अधिक प्रसार गुढीपाडव्याच्या निमित्ताने केला गेला. टाटा हाऊसिंगने मुंबई तसेच गोव्यातील त्यांच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना १० लाख रुपयेपर्यंत ‘कॅश बॅक ऑफर’ देऊ केली आहे. निश्चलनीकरणाचा सर्वाधिक फटका स्थावर मालमत्ता क्षेत्राला बसला. त्यातून उसंत मिळण्यासाठी विकासकांनी यंदा घरनोंदणीवर घसघशीत सूट देऊ केली आहे. तयार घरांबरोबरच छोटय़ा आकारातील घरांना खरेदीदारांकडून मागणी असल्याचे एका विकासकाने सांगितले. एकूण महाराष्ट्राचे २० हजार कोटी रुपयांचे नोंदणी महसुली लक्ष्य मार्चअखेरच्या वित्त वर्षांत दृष्टिक्षेपात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नव्या वाहनांसाठीही मुंबईत मोठय़ा प्रमाणात नोंदणी झाली. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात घट नोंदविण्यात आली. कंपन्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात उतरविलेल्या विविध गटांतील वाहनांकरिता विचारणा वाढल्याचे यापूर्वीच नमूद केले होते. प्रत्यक्षात चार चाकी तसेच दुचाकी वाहनांची विक्री पुन्हा एकदा वाढीच्या वेगावर स्वार झाल्याचे मारुती सुझुकीच्या मुंबई उपनगरातील एका वितरकाने सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणीत मात्र घट

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांनी वाहन खरेदीचा मुहूर्त साधून वाहनांची खरेदी केली आहे. मुंबईतील चार ही प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये गेल्या चार दिवसांत सर्व प्रकारच्या अशा दोन हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र वाहनांच्या नोंदणीत घट झाल्याचे दिसते आहे. गेल्या गुढीपाडव्याला अंदाजे १६०० दुचाकी व ७०० चारचाकी वाहनांची मुंबईतील परिवहन कार्यालयांमध्ये नोंदणी झाली होती. यंदा गेल्या चार दिवसात १४७२ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी ५८१ पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे निश्चलनीकरणाचे सावट यंदाच्या वाहन खरेदीवर असल्याची भीती खरी ठरल्याचे बोलले जात आहे. ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात ४५८ दुचाकी तर १८१ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली असून वडाळा प्रादेशिक परिवहन विभागात ४८१ दुचाकी आणि १२९ चारचाकी वाहनांची नोंद झाली. तर, बोरिवली प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३३७ दुचाकी आणि १४१ चारचाकी वाहनांची नोंद झाली. तसेच अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात १९६ दुचाकी आणि १३० चारचाकी वाहनांची नोंद झाली.

ग्राहकांची पसंती

ग्राहकांनी मौल्यवान धातू, तयार घरे आणि बहुविध पर्यायांत उपलब्ध असलेली वाहने यांना खरेदीसाठी पसंती दिली. मोबाइल व अन्य गॅझेट तसेच दागिने, भेटवस्तू यांची ई-कॉमर्स मंचावर खरेदी करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. चैत्रारंभापूर्वीच चटके देणारा यंदाचा उन्हाळा वातानुकूलित यंत्रे, कूलर आदी उपकरणांना मागणी नोंदविणारा ठरला आहे. विविध उत्पादने, वस्तू, सेवेसाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिली जाणारी थेट ४० टक्क्यांपर्यंतची सूट खरेदीदारांच्या पथ्यावर पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2017 2:42 am

Web Title: gudi padwa 2017 purchase of vehicles
Next Stories
1 तपासचक्र : ‘दृश्यम’चा वेगळा शेवट!
2 नारायण राणे ‘हाता’त ‘कमळ’ धरणार?
3 मुंबईत नववर्षाचे जल्लोषात स्वागत
Just Now!
X