गिरगावपासून गोरेगावपर्यंत नववर्षांचा जल्लोष; पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजनावर भर

गुढीपाडव्याचे मुंबईतील आकर्षण म्हणजे हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठीच्या आयोजित केलेल्या स्वागतयात्रा. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत रविवारी, स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा यात गुढीपाडव्यापासून राज्यभरात सुरू होणाऱ्या प्लॅस्टिक आणि थर्माकोल बंदीचा गजर उमटणार आहे.

गिरगावमध्ये स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची स्वागतयात्रा ‘पर्यटन महाराष्ट्राचे’ या संकल्पनेवर आधारित आहे. निवृत्त उपसचिव अनुराधा गोखले यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून सकाळी आठ वाजता गिरगावातील फडके श्री गणेश मंदिरापासून यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे.

या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे २६ जानेवारी रोजी राजपथावरील चित्ररथांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा शिवराज्याभिषेक चित्ररथ यात असेल. तसेच भगवान परशुराम यांचा २५ फूट उंच पुतळा, खंडेरायाचा देखावा आदी कलाकृती यात्रेमध्ये पाहावयास मिळणार आहेत. यासोबतच ऑगस्ट क्रांती मैदान, महालक्ष्मी मंदिर, बाणगंगा, स्वराज्यभूमी, मुंबई सेंट्रल रेल्व स्थानक, म्हातारीचा बूट, राजाबाई टॉवर, अभयारण्य, प्रतापगड आदी चित्ररथ यात्रेमध्ये सहभागी होणार असून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, डोंगररांगा, विस्तीर्ण सागर किनारे, नद्या, शिल्प, लेणी यासारख्या अनेक पर्यटन स्थळांवर प्रकाश टाकणारे चित्ररथ ही यात्रेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

मूर्तिकार योगेश इस्वलकर यांनी पर्यावरणपूरक अशा कागदी लगद्यापासून साकारलेल्या २० फूट उंची समर्थ रामदास स्वामी यांच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असणार आहे. यात्रेचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे संगीताच्या तालावर रांगोळीची जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे. यासोबतच यात्रेची रंगत वाढविण्यासाठी ढोल व ध्वजपथकांसह कोल्हापूर येथील रामकृष्ण मर्दानी खेळ विकास मंचातील तरुणांची युद्धकला आणि समर्थ व्यायाम मंदिराची मुलांची मल्लखांबांची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात येणार आहेत. स्वागतयात्रेदरम्यान होणारा कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक यात्रेमध्ये कार्यरत असणार आहे.

दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेनेच्या वतीने रविवारी नववर्ष दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ‘स्त्री शक्ती सन्मान’ अशी संकल्पना असणार आहे. गिरगाव नाक्यावरून सकाळी साडेसात वाजता सुरू होणाऱ्या या दिंडी सोहळ्यामध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक देखाव्यासह १५ चित्ररथ सहभागी होणार असून यात बेटी बचाओ-बेटी पढावो, प्लॅस्टिकमुक्त मुंबई आदी संदेशावर भर देणारे देखावेही सादर केले जाणार आहेत. यासोबतच दिंडीमध्ये  पारंपरिक नृत्ये सादर केली जाणार असून दशावतार, काटखेळ आदी आविष्कारही पाहायला मिळणार आहेत. या सोहळ्याला चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्यासह सैराट सिनेमाचा अभिनेता अक्षय ठोसर उपस्थित राहणार आहे.

वरळी येथील शिवसह्य़ाद्री फाऊंडेशनच्या वतीने जांबोरी मैदान परिसरामध्ये स्वागतयात्रेचे आयोजन केले आहे. सकाळी आठपासून सुरू होणाऱ्या या यात्रेमध्ये पाच हजार कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टिक पिशव्या नष्ट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. महिला लेझीम पथकासह सामाजिक संदेश देणारे चित्ररथ यात्रेची शोभा वाढविणार आहेत. मांडवी कोळीवाडा येथे स्वराज्याचे शिलेदार मंडळाकडूनही रविवारी सायंकाळी चार वाजता मांडवी विभागातून स्वागत यात्रा काढण्यात येणार असून यामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यात्रेचे नेतृत्व महिला करणार आहेत.

सायकल यात्रा

गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने लालबाग – परळ भागामध्ये स्वागतयात्रेचे आयोजन केले आहे.  डबेवाल्यांच्या हस्ते गुढीपूजन करून परळ रेल्वे वर्कशॉप येथून सकाळी सात वाजता ही यात्रा सुरू होईल. पारंपरिक वेषामध्ये युवक आणि युवती पर्यावरण संवर्धनासाठी सायकल यात्रा काढतील.

भारतमातेची पालखी

गोरेगाव पूर्व येथे शोभायात्रेत भारतमातेची पालखी वाहून नेण्यासाठी १५० महिला सहभागी होणार आहेत. यासोबतच विविध कलाकृतींची १५ पथके सहभागी होणार आहेत. वनराई येथून सुरू होणाऱ्या यात्रेची सांगता गोरेगाव स्टेशनजवळील दत्त मंदिर चौकात होईल.

संत परंपरांचे दर्शन

जोगेश्वरी पूर्व भागामध्ये  पी.एम.जी.पी. कॉलनी येथून सुरू होणाऱ्या स्वागतयात्रेत महाराष्ट्रातील संत परंपरांचे दर्शन घडविणारे देखावे सहभागी होणार आहेत.