सलग दुसऱ्या वर्षी मुहूर्ताला करोना टाळेबंदीचा फटका

मुंबई : करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे नव्या वर्षांतील खरेदीचा पहिलाच मुहूर्त सलग दुसऱ्या वर्षी वाया गेला. टाळेबंदीमुळे सराफी पेढय़ा, वाहनांची दालने बंद राहिल्याने खरेदीच्या उत्साहावर विरजण पडले. बांधकाम व्यावसायिकांनी सूट-सवलतींच्या घोषणा करूनही घरखरेदी झालीच नाही.

चैत्रारंभ, गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सलग दुसऱ्या वर्षी टाळेबंदीचा फटका बसला. मुहूर्ताच्या खरेदीसाठी महत्त्वाची मानली जाणारी विक्री दालने बंद होती. त्यामुळे मंगळवारी मुंबई, ठाणे, डोंबिवलीसारख्या मोठय़ा बाजारपेठा ओस पडल्या होत्या. परिणामी, नव्या मुहूर्ताला नवीन वाहन खरेदीची परंपरा यंदाही खंडित झाली.

सोन्यासह अन्य मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्याला अत्यंत महत्त्व असते. मात्र यंदाच्या या मुहूर्तापूर्वीच अंशत: टाळेबंदी लागू झाल्याने सराफी पेढय़ा आणि वाहनविक्री दालने बंद ठेवावी लागली. त्यामुळे खरेदी झालीच नाही. मुहूर्तावरील घरखरेदीलाही टाळेबंदीची झळ बसली. तेथील व्यवहारही पूर्णपणे ठप्प राहिले.

सोन्याचा भाव सध्या १० हजार रुपयांनी घसरला आहे. मुंबईत सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी (एक तोळा) ४७ हजार रुपयांवर आला आहे. चांदीचा किलोचा भाव ६६ हजार रुपयांखाली आहे. मात्र सराफी पेढय़ाच बंद असल्याने मंगळवारच्या मुहूर्तासह लग्नादी निमित्ताने होणारे मौल्यवान धातूचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

वाहनांची किरकोळ विक्री दालनेही टाळेबंदीमुळे ठप्प आहेत. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील व्यवहारही बंद आहेत. मात्र बिकट अर्थस्थिती असूनही ‘जीएसटी’, नोंदणी आदी अप्रत्यक्ष करसूट-सवलती देण्यात येत आहेत. होंडासारख्या दुचाकीनिर्मिती कंपनीने एप्रिलपासून पुढील काही महिने विविध योजना लागू करण्याचे जाहीर केले आहे. अंशत: टाळेबंदीपूर्वी या दोन्ही क्षेत्रांत लक्षणीय व्यवहार झाल्याची नोंद आहे.

विक्रीची तंत्रस्नेही शक्कल

टाळेबंदीमुळे दालने बंद ठेवावी लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी यंदा अनोखी शक्कल लढवली आहे. बंददरम्यान ग्राहकांना वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी अनेक दालनचालकांनी ऑनलाइन तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्यवहार सुरू ठेवले आहेत. बंद दालनांवर व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक झळकवून ऑनलाइन खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

परंपरा खंडित

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला सोने, वाहन आणि घर खरेदी केली जाते. परंतु यंदा सलग दुसऱ्या वर्षी सराफी पेढय़ा आणि वाहनविक्री दालने बंद ठेवावी लागली. करोना टाळेबंदीचा फटका खरेदी मुहूर्ताला बसला आणि खरेदीच्या परंपरेत यंदाही खंड पडला.