ढोल ताशांचा गजर, लेझीमचा झंकार, विठू माऊलीचा गजर, लक्षवेधक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात मुंबईत जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या विविध भागांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोधायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रांमध्ये मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, गोराई येथे गुढीपाडव्यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. जोगेश्वरी नववर्ष स्वागत समितीअंतर्गत ‘जोगेश्वरी भटकंती कट्टा’ आणि ‘नादगर्जना ढोल ताशा पथक’ यांनी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेत पुरुष आणि महिलांनी डोक्यावरे भगवे फेटे बांधले होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले ढोल पथक, लेझीम पथक, ध्वज पथक तसेच वारकरी संप्रदाय मिरवणुकीत दिसत होता. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनाबद्दल चित्ररथाद्वारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला. शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलींनी बेटी बचाव, स्त्रीभ्रूण हत्या, शिक्षणाचे महत्व याविषयीचे फलक घेवून जनजागृतीचा संदेश दिला.

प्रभादेवीमध्येही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा–झाडे जगवा, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका, स्त्री-भ्रूण हत्या थांबवा असे सामाजिक संदेश या शोभायात्रेतून देण्यात आले. यावेळी लहान मुलांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने दादर-माहिम-प्रभादेवी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढी उभारल्यानंतर प्रभादेवी मंदिरापासून दादर पर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली.

महापौर बंगल्यावर शेवटची गुढी
महापौरांचा ऐतिहासिक बंगला आता ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या बंगल्यात शेवटची गुढी उभारली.