अनेक दिवसांपासून टंचाईचे नाद घुमत असताना नववर्षांच्या स्वागतासाठी शुक्रवारी गुढीपाडव्याला मुंबईत घरोघरी उत्साहाचे तोरण लागले. नववर्षांत निसर्गाची राज्यावर आणि देशावर अमाप कृपादृष्टी होऊ दे, अशी भावना घेऊन उभारलेली गुढी.. दारावर झेंडूच्या फुलांची तोरणे.. भव्य रांगोळ्या आणि ढोलताशांच्या पथकांच्या जोडीला निघालेल्या शोभायात्रा अशा भारलेल्या वातावरणात गुढीपाढवा आणि नववर्षांचे शुक्रवारी मुंबापुरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात महापालिका निवडणुकीच्या प्रचारांचा ‘गुलाल’ही उधण्यात आला. विशेष म्हणजे राज्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेता, पाणीबचतीचा संदेश देणारे चित्ररथ पाहायला मिळाले.
शहराच्या गिरगाव, दादर-नायगाव, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, भांडुप, मुलुंड, वाळकेश्वर, लालबाग, परळ या भागांत शोभायात्रा काढण्यात आल्या. विविध ठिकाणच्या या शोभायात्रांद्वारे सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांचा, लेझीम पथकांचा समावेश पाहायला मिळाला. यात तरुणवर्गासह ज्येष्ठांचीही मोठय़ा संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. या वेळी बहुतांश ठिकाणच्या शोभायात्रा आणि मिरवणुकींतून राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीबचतीबाबत संदेश देण्यात आला. नववर्ष स्वागतयात्रा समिती, मुलुंडतर्फे या स्वागतयात्रेत या वेळी सुमारे ४८ संस्थांचा सहभाग होता. सुमारे २००० नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. राज्यातील प्रचंड दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, अमली पदार्थापासून तरुणाईने दूर राहावे म्हणून मानवी चित्ररथ, महिलांचा तिरंगी फेटे परिधान करून निघालेल्या स्कूटर रॅलीचा यामध्ये समावेश होता. यात मुलुंड पश्चिम येथील कलेश्वरनाथ प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे नववर्ष शोभायात्रा काढण्यात आली. शिस्तबद्ध अशा निघालेल्या शोभायात्रेत नटवलेल्या गुढय़ा महिलांच्या हातात दिसत होत्या.
याशिवाय चाळी, सोसायटींत गुढी उभारण्यापासून भव्य रांगोळ्या, ढोलताशा पथके आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळांचे आयोजन करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला, तर शोभायात्रांत वेगवेगळ्या चित्ररथांतून, समूह गायन, नृत्य, लेझीम पथकांद्वारे मराठी संस्कृतीचे चित्रण पाहायला मिळाले. याशिवाय महिला लेझीम पथक, ढोलपथक याबरोबरच महिला दुचाकीस्वारांच्या मिरवणुकीने लोकांचे लक्ष वेधले. याशिवाय विविध ठिकाणच्या शोभायात्रांत मुंबईतील सामाजिक-सांस्कृतिक संस्था, रहिवाशी संघ, उत्सव मंडळे उत्साहाने सहभागी झाले होते. याशिवाय राजकीय पक्षाकडूनही महापालिकेच्या निवडणुकीचे ‘रंग’ शोभायात्रात पाहायला मिळाले.

दुचाकी रॅली
शोभायात्रात महिलांच्या दुचाकी रॅलीचे लोकांकडून कौतुक करण्यात आले. नेहमी घरातील दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या महिला पारंपरिक वेश, फेटे आणि दुचाकी चालवताना पाहायला मिळाल्या. ढोलताशा पथकांच्या वाद्य जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे छायाचित्र टिपण्यासाठी गच्चीवरही गर्दी केली होती.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश

शहरात महारांगोळ्या
शहरातील विविध भागांत महारांगोळ्या काढण्यात आल्या. यात मुलुंड येथील संभाजीराजे मैदानावर महारांगोळीही काढण्यात आली. ही रांगोळी पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. यातूनही संस्कृतीचा अभिमान व सामाजिक बांधिलकीचा संदेश रांगोळीतून पाहायला मिळाला.

‘गुढी’सह सेल्फी
घरावर उभारण्यात आलेल्या गुढीसह अनेक तरुणांनी सेल्फी काढले. तरुणांसह ज्येष्ठांनाही गुढीसह सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. गुढीसह काढलेल्या सेल्फी अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर झळकत होते, तर समाजमाध्यमावरही गुढीसह काढलेल्या सेल्फीवर मित्र, कुटुंबीयांची पसंती तरुण मिळवत होते.