गुढीपाडव्याच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनी मुंबईकरांना भरभरून शुभेच्छा देण्याच्या उत्साहापोटी मोठय़ा प्रमाणावर बॅनरबाजी करून मुंबई विद्रूप केली. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच नव्हे तर मनसेचाही त्यात लक्षणीय सहभाग होता. न्यायालयाने मुंबई बॅनरमुक्त करण्याचे आदेश दिलेले असताना पालिकेने या बॅनरबाजीकडे दुर्लक्ष केले.
शुक्रवारी सायंकाळपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी हिंदू नववर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली होती. नववर्षांच्या स्वागतासाठी काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांच्या मार्गामध्ये व्यासपीठ उभारण्यात येत होते. यात्रेत सहभागी होणाऱ्यांसाठी पाणी, नाश्ता वाटपासाठी मंडप उभारून व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी पोलिसांची आणि वाहतूक पोलिसांची परवानगी न घेताच नेत्यांनी रस्त्यावरच व्यासपीठ उभे केले होते. मात्र त्या विरोधात पोलीस, पालिका अथवा वाहतूक पोलिसांनी ब्रही काढला नाही.
स्वागतयात्रांच्या मार्गामध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बॅनरबाजी करण्याची संधी सोडली नाही. आपल्या बॅनरला मोक्याची जागा मिळावी म्हणून दोन दिवस आधीच गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचे बॅनर ठिकठिकाणी झळकविले होते. तसेच राजकीय नेत्यांच्या स्वागतयात्रांचे फलक आणि बॅनर्सही निदर्शनास येत होते. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई बॅनरमुक्त करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने तीन दिवस अखंडपणे कारवाई करून बॅनर्स काढून टाकले होते. त्यामुळे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातही मंडळांची पंचाईत झाली होती. मात्र आता गुढीपाडव्याचे निमित्त साधून राजकीय नेते मंडळींनी मुंबईत मोठय़ा प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. त्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. महापालिका आता या नेत्यांविरुद्ध कोणती कारवाई करणार, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.