ओळखीतून दोघे भाऊ अतिथी भाडेकरू (पेईंग गेस्ट) म्हणून राहायला आले. त्यांपैकी एकाचे घरातील महिलेसोबत सूत जुळले. हा प्रकार तिच्या पतीला कळताच त्यांच्यात खटके उडू लागले. दररोज होणाऱ्या या भांडणांमुळे अतिथी भाडेकरूंनीच तिच्या पतीलाच मारहाण करून घराबाहेर काढले आणि आता ते ‘घरधनी’ होऊन बसले आहेत़  हा प्रकार ठाण्याजवळील कळवा परिसरात घडला आहे.
कळवा- खारेगाव परिसरात एका भाडय़ाच्या खोलीमध्ये राजेश (बदलेले नाव) हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. पत्नी, १६ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी असा त्यांचा छोटा परिवार आहे. शासकीय सेवेत ते नोकरीला आहेत. अमृत शिसोदे आणि प्रवीण शिसोदे हे दोघे अविवाहित भाऊसुद्धा कळवा परिसरातच राहात होते. गावाकडील एका मित्राचे मेहुणे असल्याने राजेशची त्यांच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांचे राजेशच्या घरी ये-जा सुरू असायची. एकेदिवशी या दोघांनी त्यांच्याकडे अतिथी भाडेकरू म्हणून राहण्याविषयी विचारणा केली. या दोघांना आपण जेवण देऊ, त्या बदल्यात ते घरभाडे भरतील, असे राजेशच्या मनात होते. घराचे भाडे वाचले, असा सल्ला राजेशला त्याच्या पत्नीने दिला. त्यानुसार, या दोघांना अतिथी भाडेकरू म्हणून ठेवण्यास राजेशने होकार दिला. काही दिवसांतच राजेशचा होकार त्यांच्याच अंगलट आला.
प्रवीण आणि राजेशच्या पत्नीचे सुत जुळले आणि त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. एकदा राजेश कामावरून लवकर घरी आला. त्या वेळी त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. यावरून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले होते. रोजच्या भांडणामुळे शिसोदे बंधूही वैतागले होते. एके दिवशी दोघा भावांनी राजेशच्या पत्नीसह शक्कल लढवली आणि राजेशला बेदम मारहाण करून घराबाहेर काढले. राजेशला घराबाहेर काढताच दोघे भाऊ त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत राहू लागले. राजेश त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी पुन्हा गेला असता या दोघांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.