26 February 2021

News Flash

करोनामुक्तांच्या पुनर्तपासणीबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे

करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्तपासणीची सुविधा सध्या मोजक्याच रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : करोनाची तीव्र, मध्यम लक्षणे असलेल्या किंवा करोनासह मूत्रपिंड, हृदयविकार असे आजार असलेल्या रुग्णांमध्ये करोनामुक्त झाल्यानंतरही शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने त्यांच्या प्रकृतीची पुनर्तपासणी आणि पुनर्वसनावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. राज्याच्या विशेष कृती दलाकडून अशा रुग्णांची पुनर्तपासणी आणि पुनर्वसनाबाबत चर्चा सुरू असून, लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात येणार आहेत.

करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्तपासणीची सुविधा सध्या मोजक्याच रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. त्यांना थकवा, धाप किंवा दम लागणे, प्राणवायूची (ऑक्सिजन) पातळी कमी होणे या शारीरिक समस्या दिसून येत आहेत. काही रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब याचे प्रमाण बदलत असल्याने त्यानुसार औषधांमध्ये बदल करावे लागतात. काहींना झोप लागत नाही, स्वप्ने पडतात, भीती वाटते. अशा रुग्णांना मानसिक उपचारांची आवश्यकता आहे. याला ‘पोस्ट कोविड सिंड्रोम’ असे म्हणता येईल. रुग्णाच्या लक्षणानुसार औषधोपचार, मानसोपचार आणि पुनर्वसन या तीन पातळ्यांवर पाठपुरावा, पुनर्तपासणी करण्याची गरज आहे. मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात असा बाह्य़रुग्ण विभाग सुरू केल्याचे राज्याच्या विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

करोनाबाधित रुग्णामध्ये सौम्य लक्षणे असल्यावर त्याच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासत नाही. परंतु फुप्फुसामध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या, प्राणवायू किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणेवर असलेल्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यास बराच कालावधी लागतो. फुप्फुसावर परिणाम झालेल्या काही रुग्णांमध्ये फुप्फुसाचा ‘फायब्रोसीसी’ हा आजारही होण्याचा संभव असतो. उपचारात ‘स्टिरॉइड’ आणि ‘टोसिलीझुमॅब’ यांच्या वापराने रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते. त्यामुळे काही रुग्णांना अन्य संसर्ग होण्याचा धोका असतो. मूत्रमार्ग किंवा फुप्फुसाचा संसर्ग झाल्यानेही काही रुग्ण पुन्हा उपचारासाठी आल्याची माहिती संसर्ग आजाराच्या तज्ज्ञ डॉ. तनु सिंघल यांनी दिली.

‘उपचार घेऊन बरे झालेल्या २२ रुग्णांमध्ये फुप्फुसाचा फायब्रोसीसी झाल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाह्य़रुग्ण विभाग सुरू नसल्याने बरे झालेल्या रुग्णांची गेल्या चार महिन्यांत पुनर्तपासणी झालेली नाही. त्यामुळे के ईएममध्ये करोनामुक्त रुग्णांसाठी दक्षता केंद्र सुरू केले आहे. मानसोपचारतज्ज्ञ दूरध्वनीच्या माध्यमातून रुग्णांशी संवाद साधतात.

आत्तापर्यंत सुमारे चार हजार रुग्णांशी संपर्क करण्यात आला आहे. मानसिक समस्या असलेल्यांना समुपदेशन केले जाते. शारीरिक त्रास असल्यास तपासणीस बोलावले जाते,’ असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातही करोनामुक्त रुग्णांची पुनर्तपासणी करण्यासाठी करोना नियंत्रण कक्षातून फोनच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. गेल्या आठवडय़ापासून सुरू केलेल्या उपक्रमातून आत्तापर्यंत सुमारे ८०० रुग्णांशी संवाद साधल्याचे रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राहुल मयेकर यांनी सांगितले.

संभाव्य धोके टाळणे शक्य..

रुग्णांना घरी सोडताना औषधे, व्यायाम करण्याच्या सूचना दिलेल्या असतात. परंतु अनेकदा रुग्ण याचे पालन योग्यरीतीने करतातच असे नाही. त्यामुळे विशिष्ट कालावधीनंतर प्रत्यक्ष तपासणी होणे गरजेचे आहे. बाह्यरुग्ण विभागात आलेल्यांची औषधशास्त्र आणि फिजियोथेरपी विभागातील डॉक्टर तपासणी करतात. यामुळे संभाव्य धोके टाळणे शक्य होते.

दळणवळणात अडचणी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने पुनर्तपासणीसाठी बोलावूनही अनेक रुग्ण येत नाहीत. कल्याण, डोंबिवलीच्या रुग्णांना सुमारे पाच हजार रुपये देऊन रुग्णवाहिकांची सोय करावी लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 3:58 am

Web Title: guidelines on retesting of corona recovered patients zws 70
Next Stories
1 Coronavirus : मुंबईत ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त
2 जेबीनगरमध्ये बिबटय़ा?
3 धरणांत निम्मा साठा
Just Now!
X