औद्योगिक गुंतवणूक वा अन्य कोणत्याही क्षेत्रावरून महाराष्ट्र आणि गुजरातची नेहमीच स्पर्धा किंवा तुलना केली जाते. भाजपला टोमणे मारण्यासाठी गुजरातचा वापर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे किंवा शिवसेनेकडून केला जातो. पण औद्योगिक गुंतवणुकीत गुजरात हेच देशात आघाडीवरचे राज्य असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालात देण्यात
आली आहे.
औद्योगिक गुंतवणुकीत १९९१ ते २०१४ या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक १८,७०९ प्रकल्प सुरू झाले. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात १० लाख, ६३ हजार कोटींची गुंतवणूक झाली. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये प्रकल्पांची संख्या कमी असली तरी गुंतवणुकीत गुजरात आघाडीवर आहे. गुजरातमध्ये १२,५८४ प्रकल्प सुरू झाले असले तरी त्यातून १३ लाख, १८ हजार कोटींची गुंतवणूक झाली.
तामिळनाडू ( ५ लाख १२ हजार कोटी), आंध्र प्रदेश (९ लाख, ३९ हजार कोटी) तर उत्तर प्रदेशात ३ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे.

उद्योगाचा विकास संथगतीने
रोजगार वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला असला तरी राज्यातील उद्योग क्षेत्राचा विकास समाधानकारक नाही हे पुढे आले आहे. २०१२-१३ मध्ये उद्योग क्षेत्रात विकासाचा दर ९.३ टक्के होता. गेल्या वर्षी हाच दर ४.५ टक्क्यांवर घटला होता, पण यंदा हा दर चार टक्केच अपेक्षित धरण्यात आला आहे. निर्मिती क्षेत्रावर केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने लक्ष केंद्रित केले असले तरी या क्षेत्रातही विकास दर गतवर्षांच्या तुलनेत केवळ अर्धा टक्के वाढला आहे.