News Flash

काँग्रेसच्या आशा पल्लवित

गुजरातमध्ये मतांचे ध्रुवीकरण होते याचा अनुभव असल्याने राहुल गांधी यांनी आधीपासूनच खबरदारी घेतली.

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर लगेचच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील पराभवामुळे राहुल गांधी यांची सुरुवात खराब झाल्याची ओरड भाजपने सुरू केली असली तरी गुजरातच्या निकालाने उलट काँग्रेसच्या आशा आणि अपेक्षा वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या एकतर्फी विजयी अश्वमेघाला लगाम लावण्यात काँग्रेसला यश आले. गुजरात काँग्रेस संघटना पूर्णता विस्कळीत होती. नेत्यांमध्ये कोणाचा पायपूस कोणात नव्हता. माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला हे महत्त्व मिळत नसल्याने नाराज होते. अशा वेळी संघटना बांधणीचे काम करण्यापासून राहुल गांधी यांनी सुरुवात केली. गुजरातमध्ये मतांचे ध्रुवीकरण होते याचा अनुभव असल्याने राहुल गांधी यांनी आधीपासूनच खबरदारी घेतली. राज्यातील सर्व मोठय़ा मंदिरांना भेटी दिल्या. पाटीदार समाजाचे हार्दिक पटेल, इतर मागासवर्गीय समाजाचे अल्पेश ठाकूर आणि दलित समाजातील जिग्नेश मवानी यांनी बरोबर घेऊन राहुल गांधी यांनी सोशल इंजिनियरिंग केले.  शहरी भागात पक्षाची संघटना तेवढी भक्कम नसल्याने पक्ष सत्तेच्या समीप जाऊ शकला नाही.  हिमाचल प्रदेशमध्ये आलटून पालटून सत्ताबदल होण्याची परंपरा कायम राहिली. गुजरातच्या तुलनेत काँग्रेसने हिमाचल प्रदेशची निवडणूक तेवढी गांभीर्याने घेतली नव्हती. हिमाचल प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यावर अनेक आरोप झाले. सीबीआयने गुन्हे दाखल केले. काँग्रेस पक्षात प्रचंड दुफळी होती. मुख्यमंत्री सिंग आणि प्रदेशाध्यक्षांमधून विस्तवही जात नव्हता.

काँग्रेसची खरी कसोटी आता कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमध्ये सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान असेल. कारण कर्नाटक आणि पंजाब या दोनच मोठय़ा राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची आता खरी कसोटी लागणार आहे. आठ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरिता पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी गुजरातच्या निकालाचा उपयोग होऊ शकतो. गुजरातमध्ये पक्षाची कामगिरी खराब झाली असती तर काँग्रेस आणखी गाळात जाणार, असा संदेश गेला असता. याशिवाय पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असलेले नेते आणि कार्यकर्त्यांनी बाहेरची वाट स्वीकारली असती. पण राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला सर्वसामान्य जनता स्वीकारू शकते हा गुजरातचा निकाल पक्षाला निश्चितच फायदेशीर ठरू शकतो. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसला ३३ टक्के मते मिळाली होती, यंदा पक्षाच्या मतांमध्ये जवळपास नऊ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. हा बदल काँग्रेससाठी निश्चितच सुखावह ठरणार आहे.

राहुल गांधी यांनी आघाडीच्या राजकारणाबाबत अद्याप काहीच सुतोवाच केलेले नाही. २००४च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी तेव्हा सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधातील वातावरणाचा फायदा घेण्यासाठी माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार, लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य विरोधी नेत्यांशी चर्चा केली होती व त्यांना बरोबर घेतले. राहुल गांधी यांनी आतापर्यंत तरी आघाडीच्या राजकारणाला छेद देणारे निर्णय घेतले आहेत. आठ राज्यांच्या निकालांवरून लोकसभा निवडणुकीकरिता पुढील रणनीती राहुल गांधी ठरवावी लागेल. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या गुजरात या गृह राज्यात भाजपला कडवी लढत देऊन काँग्रेसने वातावरण तयार केले आहे. मोदी यांना राहुल गांधी आव्हान देऊ शकतात, असा संदेश देण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 4:00 am

Web Title: gujarat election result 2017 congress wins 80 seats in gujarat
Next Stories
1 ‘वॉटर रेल’ पक्षी २३ वर्षांनंतर ठाणे परिसरात
2 दोन पावलांत त्यांनी मृत्यूला मागे टाकले..
3 मुंबईत विद्युत वाहनांचा मार्ग खडतरच!
Just Now!
X