गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काहीशा अनपेक्षित कलामुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स तब्बल ६०० अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही १०, १३४. ३५ ची पातळी गाठली. गुजरातमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात भाजपने स्पष्टपणे आघाडी घेतली होती. मात्र, काहीवेळातच काँग्रेसने झपाट्याने मुसंडी मारत हे अंतर कमी केले. सध्याच्या कलानुसार १८२ जागांपैकी भाजप ९२ जागांवर तर काँग्रेसने ८४ जागांवर आघाडी घेतली आहे. यानुसार भाजप बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचला असला तरी काँग्रेसच्या जागांमध्ये पूर्वीपेक्षा २० जागांची वाढ झाली आहे. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिल्यास काँग्रेस पक्षाच्यादृष्टीने हे मोठे यश म्हणावे लागेल.

मात्र, एक्झिट पोल्सनी गुजरातमध्ये भाजपला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. उद्योगजगतानेही काहीसा असाच अंदाज बांधला होता. मात्र, मतमोजणीचे सुरूवातीचे कल पाहता हा अंदाज खोटा ठरण्याची शक्यता आहे. त्याचेच पडसाद भांडवली बाजारात उमटत असल्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रचारादरम्यान मोठा बदल घडलेला दिसून आला. तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या दिग्गज मंत्र्यांनी गुजरातमध्ये सभा घेऊन काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचाराचा धडाका लावला. विकासाचे राजकारण पुढे करत भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. तर नेमका विकास काय आणि कुठे झाला हे दाखवत राहुल गांधींनी भाजपला भंडावून सोडले आहे. अशात जनमत कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. गुजरात विधानसभा निकाल ही हार्दिक पटेलच्या अस्तित्त्वाची लढाई आहे असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरे आज दिवसभरात स्पष्ट होणारच आहेत. गुजरातच्या १८२ जागांपैकी भाजपला किती जागा मिळणार आणि काँग्रेसला किती हे आज समजू शकणार आहे.