News Flash

गुजरातकडून महाराष्ट्राला ‘हृदय’ दान!

आव्हान मोठे होते.. परवानग्यांचे सोपस्कार कसे पार पडणार या चिंतेने हृदयाचे ठोके वाढत होते..

अवयवदानाबाबत महाराष्ट्रात प्रभावी जनजागृती नसल्यामुळे अनेकदा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य राज्यांत जावे लागते.

आव्हान मोठे होते.. परवानग्यांचे सोपस्कार कसे पार पडणार या चिंतेने हृदयाचे ठोके वाढत होते.. अखेर दिल्लीतून सूत्रे हलली.. गुजरातच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली.. सुरतेच्या एका ‘ब्रेन डेड’ रुग्णाचे हृदय मुंबईतील एका रुग्णाला जीवनदान देणार होते.. सुरतेच्या त्या रुग्णालयात रात्री साडे नऊ वाजता शस्त्रक्रिया करून रुग्णाचे हृदय काढले.. त्याचा रक्तप्रवाह थांबवला अन् थेट ‘एअर अँब्युलन्स’ने मुंबईत पोहोचलो.. तेथून अवघ्या वीस मिनिटांमध्ये फोर्टिसमधील शस्त्रक्रियागृहात पोहोचलो.. रात्री दीडच्या सुमारास मुंबईतील मनोज जोशीच्या हृदयाचे ठोके सुरू झाले.. अशा शब्दांत विख्यात हृदयशल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी गुजरातने महाराष्ट्राला दिलेल्या हृदयाचा प्रवास शनिवारी उलगडून दाखवला!
४९ वर्षांच्या मनोज जोशी (नाव बदलले आहे) यांनी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी फोर्टिस रुग्णालयात आपले नाव नोंदविल्यानंतर दोन वेळा शस्त्रक्रिया होता होता राहिली. पहिल्यांदा एका ब्रेन डेड रुग्णाचे हृदय उपलब्ध झाले खरे, परंतु ऐनवेळी नातेवाईकांनी अवयवदानाला नकार दिला. दुसऱ्यावेळी दात्याची प्रकृती योग्य नसल्यामुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. त्यानंतर १८ डिसेंबरला डॉ. अन्वय यांना सुरतमधील एका रुग्णाचे हृदय मिळू शकत असल्याचे समजले. त्यांनी तातडीने सुरतला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर डॉक्टरांचा एक गट होता. तर दुसरा गट फोर्टिसमध्ये मनोजच्या शस्त्रक्रियेसाठी सज्ज होता. प्रश्न होता आंतरराज्य परवानगी मिळण्याचा. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातेत ‘झोनल ट्रान्सप्लांट सेंटर’ची व्यवस्था नसल्याने तेथील आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रयत्न सुरू झाले. मुंबईतील ‘जायंट इंटरनॅशनल’ संस्थेने याकामी मोठी मदत केली. पंतप्रधान कार्यालयाकडेही परवानगीची विनंती करण्यात आली. या सर्व गडबडीत वेळेचे महत्त्व अनमोल होते..पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ते जाणले आणि गुजरातच्या आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर गुजरातहून मुंबईत हृदय नेण्याची परवानगी मिळाली आणि डॉक्टरांनी ३९ वर्षीय जगदीश पटेल या ‘ब्रेन डेड’ रुग्णाचे हृदय काढले. सुरतेच्या ‘डोनेट लाइफ’ या अवयवदानासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने हे हृदय मिळवून दिल्याचे डॉ. मुळे म्हणाले. यानंतर क्षणाचाही वेळ न दवडता हृदय घेऊन एअर अँब्युलन्स मुंबईकडे झेपावली. पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था केल्यामुळे विमानतळ ते रुग्णालय असा प्रवास अवघ्या वीस मिनिटांत पार पडला. बरोबर मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी मनोजवर शस्त्रक्रिया सुरू झाली आणि एक वाजून तीस मिनिटांनी मनोजच्या हृदयाचा पहिला ठोका वाजला. डॉ. अन्वय मुळे यांच्याबरोबर डॉ. संजीव जाधव, डॉ. विजय शेट्टी आणि डॉ. सुप्रिया यांनी हे प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पाडले.

अवयवदानाबाबत महाराष्ट्रात प्रभावी जनजागृती नसल्यामुळे अनेकदा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य राज्यांत जावे लागते. सुरत येथे अवयवदानाची चळवळ खऱ्या अर्थाने रुजली आहे. मात्र हृदयदान प्रथमच झाले आहे. गुजरातने महाराष्ट्राला दिलेल्या या ‘हृदयाची गोष्ट’ अनमोल म्हणावी लागेल.
– डॉ. अन्वय मुळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:53 am

Web Title: gujarat gave heart gift for maharashtra
Next Stories
1 पत्नीच्या खुनासाठी पतीला जन्मठेप
2 खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘वेतन उधळपट्टी’
3 कांदिवली दुहेरी हत्याकांडातील भंबानींची गाडी सापडली
Just Now!
X