विलायतेतून उच्चशिक्षण घेऊन आल्यानंतरही अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या एका ठिकाणी भारतातील जातीव्यवस्था व अस्पृश्यता नष्ट करण्याचा संकल्प केला, त्या बडोद्यातील कामठी बागेत त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मुक्त विद्यापीठही स्थापन करण्यात येणार आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी अहमदाबाद येथे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन बडोद्यातील संकल्पित आंबेडकर स्मारकाबाबत चर्चा केली. त्यावेळी बडोदा येथील कामठी (सयाजी उद्यान) येथे आंबेडकर स्मारक उभारण्याबाबत सरकारने आधीच निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पटेल यांनी दिली.
विलायतेतून उच्चशिक्षण घेऊन बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थानात नोकरीसाठी गेले असता, त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. आपण इतके उच्च्चशिक्षत असूनही या जातीय व्यवस्थेत आपला असा अवमान होत असेल, तर आपल्या अडाणी समाजाची काय गत असेल, त्यांना किती यातना सहन कराव्या लागत असतील, या विचाराने बाबासाहेब अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थेतूनच त्यांनी कामठी बाग म्हणजे आताच्या सयाजी उद्यानातील एका झाडाखाली बसून देशातील जातीयता नष्ट करण्याचा संकल्प केला. देशातील दलित समाज त्या स्थळाला संकल्पभूमी मानतो. त्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक व्हावे, अशी मागणी होती. गुजरात सरकारने ती मान्य केली असून, त्या जागेवर भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीचे निमित्त साधून गुजरातमध्ये त्यांच्या नावाने मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती आनंदीबेन पटेल यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.