काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून चेहरा जाहीर करण्यास नकार दिल्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी शुक्रवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. बोफोर्स या गांधी घराण्याशी संबंधित संवेदनशील विषयावर माजी परराष्ट्रमंत्री माधवसिंह सोळंकी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच काँग्रेस नेतृत्वाने सोळंकी यांचे पुत्र आणि प्रदेशाध्यक्ष भरतसिंह यांना झुकते माप दिल्याने वाघेला यांची कोंडी झाली आणि त्यातून त्यांना पक्ष सोडावा लागला.

काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशी निष्ठा हा महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. सोनिया गांधी यांनी राजकारणात यावे म्हणून घोषणाबाजी करणारे हरयाणाचे भूपिंदरसिंग हुड्डा यांना भजनलाल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून पक्षाने दोनदा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. गुजरातमध्ये अशाच पद्धतीने सोळंकी यांना विशेष महत्त्व दिले जाते. बोफोर्स चौकशी गुंडाळावी असे पत्र नरसिंहराव सरकारमध्ये परराष्ट्रमंत्रिपद भूषविणाऱ्या माधवसिंह सोळंकी यांनी तेव्हा स्विडिश परराष्ट्र खात्याला दिले होते. स्विडिश सरकारने या पत्राचा हवाला देत भारत सरकार चौकशीसाठी गंभीर नाही, असे जाहीर केले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. नरसिंहराव यांनी सोळंकी यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. बोफोर्सवरून मदत केलेल्या नेत्याला अशी वागणूक दिल्याने गांधी घराण्याची सोळंकी यांना सहानुभूती मिळाली. त्यातूनच लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आल्यावर भरतसिंह सोळंकी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. गुजरात प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी वाघेला यांचा पत्ता कापण्यास सुरुवात केली. वाघेला यांनी वारंवार काँग्रेस नेतृत्वाचे लक्ष वेधूनही दिल्लीने भरतसिंह सोळंकी यांनाच झुकते माप दिले. सोळंकी यांनी विरोध केल्यानेच वाघेला यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास नकार देण्यात आला होता. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशी निष्ठावान असल्यास सारे माफ असते, अशी मार्मिक प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

‘भाजप प्रवेश नाही’

वाघेला यांनी शुक्रवारी ७७व्या वाढदिवसालाच काँग्रेसचा राजीनामा दिला. मात्र भाजपमध्ये प्रवेश किंवा नव्या पक्षाची स्थापना करण्याचा विचार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. दोन दशकांपूर्वी भाजप सोडून वाघेला काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. वाघेला यांनी भविष्यातील योजनांबाबत बोलण्याचे टाळले.

पदमुक्त करण्याची सोनींची मागणी

एम. एम. कृष्णा यांच्यानंतर शंकरसिंह वाघेला या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. गुरुदास कामत यांनी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला. अंबिका सोनी यांनीही पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नेतेमंडळी प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.