मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र (आयएफसी) गुजरातमधील अहमदाबादजवळ हलविण्यात आल्यानंतर आता या केंद्रात आंतरराष्ट्रीय सराफ केंद्र सुरू करण्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्याने मुंबईतील सराफ केंद्राचे महत्त्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते.

ढोलावीरा येथील पुरातत्त्व संग्रहालयाचा विकास, अहमदाबादजवळ सागरी संग्रहालयाची उभारणी, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचे विस्तारीकरण, अहमदाबाद-मुंबई वेगवान गाडीसाठी पाठपुरावा या माध्यमातून अर्थसंकल्पात गुजरात राज्याला झुकते माप देण्यात आले आहे. या तुलनेत विरोधकांची सत्ता असलेल्या महाराष्ट्राच्या हाती फारसे लागलेले नाही.

आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईत उभारण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी केली होती. या दृष्टीने तयारी सुरू झाली होती व वांद्रे-कुर्ला संकुलातील जागाही निश्चित करण्यात आली होती. केंद्रात सत्ताबदल होताच भाजप सरकारने गुजरातमधील गांधीनगर-अहमदाबादजवळील ‘गिफ्ट सिटी’ला प्राधान्य दिले. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र ‘गिफ्ट सिटी’त सुरू करण्यात आले. तसेच या केंद्राचा पूर्णपणे वापर सुरू झाल्यावर मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असे तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले होते.

‘गिफ्ट सिटी’त १९ विमा कंपन्या, ४० बँकांची कार्यालये सुरू झाली आहेत. याशिवाय धातू चाचणी केंद्रही सुरू झाले आहे, असा उल्लेख विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.

सोने-चांदीचा सराफा बाजार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात आहे. पण आंतरराष्ट्रीय सराफा बाजार आता ‘गिफ्ट सिटी’त उभारण्याची घोषणा झाली. सराफा बाजारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ‘गिफ्ट सिटी’चा सहभाग वाढेल, असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. यातून मुंबईतील सराफा बाजाराचे महत्त्व साहजिकच कमी होईल. केंद्रातील भाजप सरकारने मुंबईऐवजी अहमदाबादला नेहमीच झुकते माप दिले आहे. याबद्दल शिवसेनेने यापूर्वी टीकाही केली होती.