News Flash

साहित्य अकादमीच्या उद्देशाला अद्याप यश नाही

ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार यांची खंत

ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार यांची खंत

विविध भारतीय भाषांमधील साहित्याची देवाणघेवाण व्हावी, या हेतूने साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली होती, परंतु तो हेतू पुरेशा प्रमाणात साध्य झाला आहे, असे म्हणता येणार नाही. भारतीय भाषांमधील साहित्याच्या प्रसारासाठी, अनुवादासाठी विविध प्रकारच्या योजना स्वातंत्र्यानंतर आखण्यात आल्या असल्या तरी त्याची पूर्तता अद्यापही झाली नसल्याची खंत ज्येष्ठ कवी-गीतकार गुलजार यांनी व्यक्त केली. नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात सुरू असलेल्या टाटा लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. या महोत्सवात शुक्रवारी एका विशेष कार्यक्रमात गुलजार यांना यंदाच्या ‘पोएट लॉरियट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुरुवारपासून सुरू झालेल्या टाटा महोत्सवाचा दुसरा दिवसही विविध कार्यक्रमांनी गजबजलेला राहिला. तरी मुख्य आकर्षण होते ते गुलजार यांच्याबरोबरच्या संवाद मैफिलीचे. यंदाचा टाटा महोत्सव हा ‘साहित्याला भाषा नसते!’ या कल्पनेभोवती गुंफलेला असून सन्मान सोहळ्यानंतर झालेल्या या संवादात हाच धागा पकडत लेखक पवन वर्मा यांनी गुलजार यांना बोलते केले. या वेळी त्यांनी भाषा आणि साहित्याच्या समकालीन संदर्भावर भाष्य केले. आजच्या काळात इंग्रजी भाषा अवगत असणे गरजेचे असून इंग्रजीविषयी द्वेष बाळगण्याची आवश्यकता नाही. भारतीयांची इंग्रजी ही अधिक भारतीय होत चालली असून येत्या शतकभरात ती इथलीच होऊन जाईल. इतकेच नव्हे तर, सध्याचे भारतीय इंग्रजी साहित्य हे सहा दशकांपूर्वीच्या मुल्कराज आनंद, निराद चौधरी आदींच्या साहित्यापेक्षा निराळे असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

कवितेविषयी बोलताना ते म्हणाले की, कविता ही त्या त्या भाषेचे सारस्वरूप असते, परंतु कोणत्याही एकाच भाषेतून काव्याचा संपूर्ण चेहरा दिसून येणार नाही. यासाठी विविध भाषांतील कवितांचे परस्परांत अनुवाद व्हायला हवेत. आपण स्वत: मराठीतील कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, दिलीप चित्रे आदींच्या कवितांचे अनुवाद केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अरुण कोलटकरांना भेटण्याची अपार इच्छा होती, पण त्यांच्याशी भेट होण्याचा योग आला नाही, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 12:46 am

Web Title: gulzar comment on sahitya akademi
Next Stories
1 रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
2 अधिकाऱ्यांसाठी आता धनादेश ‘तारण’हार!
3 नोटाबंदीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांची परवड
Just Now!
X