नाशिक येथील सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी दिला जात असताना एका सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून चुकून झालेल्या गोळीबारात आठ सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विजयादशमनिमित्ताने सप्तश्रृंगी गडावर प्रतिवर्षी बोकडबळी दिला जातो. बोकडबळी देताना सुरक्षारक्षक हवेत गोळीबार करतात. गोळ्यांच्या फैरींबरोबरच बोकडाची मान एका घावात उडवली जाते अशी येथील प्रथा आहे. मंगळवारी प्रथेप्रमाणे बोकडबळीसाठी सुरक्षारक्षक १२ बोअर रायफलमध्ये राऊंड लोड करून उभे होते. त्याचवेळी गर्दीतील एकाचा धक्का लागल्याने बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी वरच्या छपराला धडकली. त्याचे उडालेले छर्रे लागून आठ सुरक्षारक्षक जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस व ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी यांनी जखमींना त्वरीत वणी व कळवण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलवले. या घटनेनंतर दर्शन सुरळीत सुरू असून अपवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन सप्तश्रृंगी गडाच्या विश्वस्तांनी केले आहे.