17 September 2019

News Flash

खाऊखुशाल : शतकी चिक्की

मुंबईतील ‘गुप्ता चिक्की आणि चना भंडार’मध्ये गेली शंभर वर्षे चिक्की तयार केली जात आहे.

वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळण्याचा एक फायदा होतो. त्या व्यवसायातील कौशल्य जुन्या मंडळींकडून मिळते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते कौशल्य पुढील बरेच दिवस विकसित करता येते. या परंपरेत अनेकांचे व्यावसायिक यश अवलंबून असते. मुंबईतील असे बरेच परंपरागत व्यवसाय बहरले आहेत. गिरगावातील ‘गुप्ता चिक्की आणि चना भंडार’ यापैकीच एक.

चिक्की हा तसा रोजच्या खाण्यातील पदार्थ नाही, पण तो तसा असायलाही काहीच हरकत नाही, कारण त्यात असणारे घटक पदार्थ. कुठल्याही वयातील मंडळींना कधीही, कुठेही खाता येणारी, प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी आणि आरोग्याला चांगली अशी चिक्की मुंबईकरांना आठवते फक्त मुंबई-पुणे प्रवासात. लोणावळ्याला गेल्यावरच चिक्कीची खरेदी करायची असा जणू काही नियमच; पण मुंबईतील ‘गुप्ता चिक्की आणि चना भंडार’मध्ये गेली शंभर वर्षे चिक्की तयार केली जात आहे. रमेश गुप्ता हे आजोबा शिवनाथ गुप्ता आणि वडील नंदलाल गुप्ता यांच्याकडून मिळालेली परंपरा निगुतीने चालवत आहेत. ज्या काळात गिरगावमधील दुकाने ही सध्याच्या रस्त्याच्या उंचीपेक्षा किती तरी उंचावर होती आणि लोकांना काठीच्या साहाय्याने कुठली चिक्की हवी आहे हे दुकानदाराला सांगावे लागत असे तेव्हापासून ठाकूरद्वार रस्त्यावरील गुप्ता यांचे हे चिक्की भांडार अस्तित्वात आहे. एक पैशापेक्षाही कमी पैशात चिक्की विक्रीला सुरुवात झालेल्या याच दुकानातून मुंबईतील अनेक कारागीर चिक्की बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन गेली आहेत.

‘गुप्ता चिक्की आणि चना भंडार’चे वैशिष्टय़ म्हणजे चिक्की विकत घेतानाच ती कशी तयार होते, याचे प्रात्यक्षिकही बाजूला पाहू शकता. येथे तब्बल ३०-३५ प्रकारच्या चिक्क्य़ा मिळतात. त्यात गूळ आणि साखर अशा दोन्हींपासून बनवल्या जाणाऱ्या चिक्कींचा समावेश आहे. गुळापासून बनवल्या जाणाऱ्या चिक्क्या यांची खासियत आहे, कारण हा गूळ खास कराडवरून मागविण्यात येतो. इथे तुम्हाला राजगिरा, शेंगदाणा, कुरमुरा, चणे, खोबरे, ड्रायफ्रूट, शेंगदाणा क्रशपासून तयार केलेल्या चिक्की मिळतील. त्यात कमी-अधिक गोड असे प्रकार आहेत. ओल्या नारळाच्या क्वचितच आढळणाऱ्या दोन वेगळ्या चिक्क्या येथे मिळतात. कोईम्बतूरवरून येणाऱ्या सल्ली नारळापासून तयार केलेली पांढरी चिक्की आणि राजापुरी नारळाची चॉकलेटी रंगाची चिक्की. उभ्या किसलेल्या नारळापासून या दोन्ही चिक्क्या तयार होतात. बारीक किसलेल्या नारळापेक्षा या दिसायला वेगळ्या, चवीला गोड आणि चावण्याचे फार कष्ट न घेता तोंडात विरघळणाऱ्या आहेत. त्याशिवाय पाच ते सात वेगवेगळे पदार्थ एकत्र करून तयार केलेल्याही चिक्क्याही आहेत. ‘पंचस्टार’ आणि ‘सेव्हन स्टार’ नावाने त्या ओळखल्या जातात. त्यात तीळ, शेंगदाणे, चणे, कुरमुरे, खोबरे, राजगिरा, काजू, पिस्ता यांचा समावेश असतो. ड्रायफ्रूट चिक्की इलायची, जायफळ, काजू, बदाम, पिस्त्यापासून साखरेच्या पाकात तयार केली जाते.

प्रत्येक चिक्कीसाठीचा पदार्थ साफ करणे, गरजेनुसार त्याची विभागणी करणे, वाटणे, भाजणे, पाक तयार करणे, पाटय़ावर लावणे, कापणे, पॅकिंग आणि विक्री अशी सर्व कामे येथेच केली जातात. चिक्कीसाठी वापरला जाणारा प्रत्येक पदार्थ सुप्रीम प्रतीचाच वापरला जातो. ऋतुमानानुसार पाक तयार करण्याची पद्धत बदलत असते. त्याची योग्य ती अंमलबजावणी केली नाही तर चिक्कीची चव बदलते. चिक्की लाटण्यासाठी लाकडी पाट आहेत. एका पाटय़ावर एका वेळी पाच ते दहा किलो चिक्की लाटली जाते. त्यानंतर ती पत्र्याच्या चौकोनी भांडय़ामध्ये पसरवून त्याला काप दिले जातात आणि थंड झाल्यावर पॅकिंग करण्यात येते. पन्नास ग्राम ते एक किलो अशी सर्व प्रमाणात तुम्हाला चिक्की विकत घेता येते. दररोज दुपारी तीन रात्री दहा वाजेपर्यंत येथे चिक्की बनवण्याचे काम चालते. चिक्की होलसेलमध्ये न विकता याच दुकानात विकली जाते. त्याच्या किमती दहा रुपये पन्नास ग्राम ते अडीचशे ते तीनशे रुपये किलोच्या दरम्यान आहेत.

चिक्कीसोबतच शेंगदाणा, राजगिरा, साधे, पॉलिश आणि काळ्या तिळाचे लाडूही येथे मिळतात. उपवासाच्या काळात शेंगदाणा, राजगिरा चिक्की आणि लाडूला मोठी मागणी असते. फक्त राजगिऱ्याच्या लाह्य़सुद्धा येथे मिळतात. सोबतीला चणे, शेंगदाणे, काळे चणे, कुरमुरे, चुरमुरे हेदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ठाकूरद्वारच्या दिशेने जाताना अगदी सहज दिसेल आणि कदाचित दुर्लक्षही होईल असे फुटपाथला लागूनच हे दुकान आहे; पण तुम्हाला चिक्की आवडत असेल तर सतत लोणावळ्याला पळण्याची गरज नाही. आता तुम्हाला कळले आहेच की, मुंबई शहरात चांगली चिक्की कुठे मिळते.

गुप्ता चिक्की आणि चना भंडार

  • कुठे – २२४, तारा महल बिल्डिंग, ठाकूरद्वार रोड, करेल वाडी, चर्नी रोड (पूर्व), मुंबई-४०० ००४
  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत.

nanawareprashant@gmail.com

@nprashant

First Published on August 5, 2017 2:12 am

Web Title: gupta chikki bhandar charni road gupta chikki