गुणगुणाव्या आणि सतत ऐकत राहाव्या अशा मराठी चित्रगीतांची हरविलेली परंपरा पुन्हा रुजविणाऱ्या गीतकार गुरू ठाकूर यांच्याशी गीतगप्पांसह अभिनय-चित्रपट-नाटक-पटकथा अशा बहुविध कलाघटकांवर चर्चा करण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादातून मिळणार आहे. शुक्रवार, २६ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. गप्पांची ही मैफल संवादक मिलिंद कुलकर्णी जमवणार आहेत.

जागतिक संगीताच्या अफाट पसाऱ्यातही ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हारवारी’, ‘नटरंग उभा’, ‘आता वाजले की बारा’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’, ‘माऊली माऊली’ ही मराठी गीते आज आबालवृद्धांच्या ओठांवर रुळू लागली ती गुरू ठाकूर यांच्या शब्दकिमयेमुळे.

वर्तमानपत्रातून स्तंभलेखन, व्यंगचित्रकार म्हणून काम करणाऱ्या गुरू ठाकूर यांनी ‘सांजभूल’, ‘रेशीमगाठी’, ‘तुझ्याविना’ अशा मालिकांमधून अभिनयही के ला. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘जगावेगळी’, ‘मिशा’सारख्या मालिकांसाठी पटकथा आणि संवादलेखनही केले.

गेल्या वीस वर्षांत सर्वसामान्यांच्या आयुष्यात झालेले बदल, घडलेल्या सामाजिक-सांस्कृतिक घटना आणि बदलत गेलेली अभिरुची लक्षात घेत प्रत्येक पिढीला आवडतील अशी गीते लिहिणाऱ्या या गीतकाराचा सर्जनशील प्रवास ‘सहज बोलता बोलता’मधून समोर येणार आहे.

शब्दांच्या माध्यमातून..

कुठलीही एक वाट ठरवून चालण्यापेक्षा कलेच्या प्रांतात मुक्त मुशाफिरी करणाऱ्या या कलाकाराला कवितेच्या, शब्दांच्या माध्यमातून आपली वाट सापडली. ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गीते लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘नटरंग’ चित्रपटातील ‘खेळ मांडला’, ‘नटरंग उभा’सारखी भावपूर्ण गाणी असोत वा ‘वाजले की बारा’सारखी उत्तम लावणी या गाण्यांनी मराठी मनांना लावलेले वेड आजही कमी झालेले नाही.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_26June येथे नोंदणी आवश्यक.