गुटखा-पानमसाला-सुगंधी सुपारी बंदीला वर्षभराची मुदतवाढ

राज्यात गुटखा बंदीची अंमलबजावणी केल्यानंतर परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला असून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची नोंदणी आणि वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

गुटखा खाल्ल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर पानमसाला, सुगंधी सुपारी यांच्यावरही बंदी घातली गेली. ही बंदी २० जुलै २०१९ पासून आणखी एक वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यानुसार गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी, मावा-खर्रा यांचे उत्पादन, साठा, वितरण आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

गुटखा बंदीनंतर तो खाणाऱ्यांनी तंबाखू व पानमसाला, सुगंधी सुपारी अशा गोष्टी वेगवेगळ्या घेऊन तो एकत्र करून गुटख्यासारखा खाणे सुरू केले. त्याचबरोबर विदर्भात पानाच्या टपऱ्यांवर असेच मिश्रण खर्रा म्हणून तर राज्याच्या इतर काही भागात मावा म्हणून विकले जाते. पानमसाला-सुगंधी सुपारीच्या बंदीतून अशा प्रकारच्या गुटखासदृश मिश्रणाची विक्री रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली.

गुटखा बंदीनंतर राज्यात त्याची निर्मिती आणि विक्री थांबली. मात्र, काही जण परराज्यातून गुटख्याची चोरटी वाहतूक करत असल्याचे आढळले. त्यामुळे गुटख्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी आता अशी वाहतूक करणाऱ्या वाहनाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या वाहनाच्या चालकाचा वाहन चालवण्याचा परवानाही रद्द करण्यात येईल. गुटखा-पानमसाला-सुगंधी सुपारी बंदीला आणखी वर्षभराची मुदतवाढ देणारी आणि वाहनाची नोंदणी व वाहनचालकाचा परवाना रद्द करण्याची तरतूद असलेली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले.