ट्रॉम्बे परिसरात कामे पूर्ण करण्यात कंत्राटदारांकडून दिरंगाई; चांगली गटारे तोडून नवी बांधण्याचा घाट घातल्याचा आरोप

ट्रॉम्बेतील नौसेना कार्यालय परिसरातील मुख्य रस्त्यालगत गेल्या अनेक दिवसांपासून गटारांची कामे रखडलेली आहेत. कंत्राटदाराने रस्त्यालगत खोदकाम केल्याने या परिसरात असलेल्या शाळेतील मुलांना बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरातील रखडलेली ही गटरांची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक ठिकाणी गटारे आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र कंत्राटदारांकडून ही कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याने याचा मोठा त्रास शाळकरी मुले आाणि रहिवाशांना सहन करावा लागत आहे. ट्रॉम्बे परिसरातदेखील अशाच प्रकारे गेल्या महिनाभरापासून ही कामे सुरू आहेत. चांगली गटारे असूनदेखील ती गटारे तोडून पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने गटारे बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी जुनी गटारे तोडून त्याचे डेब्रिज त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. परिणामी, या परिसरातून जाताना रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ट्रॉम्बेतील याच नौसेना कार्यालयाजवळ काही खासगी आणि पालिका शाळादेखील आहेत. मात्र याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून ही गटारांची कामे सुरू असल्याने शाळा सुटल्यानंतर येथील विद्यार्थ्यांना गेटबाहेर पडताना मोठी कसरत करावी लागत आहे.

तर मुख्य रस्त्यावरदेखील नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असल्याने शाळेतील लहान मुले ही याच गटारांच्या बाजूने चालत बस अथवा घरापर्यंत जातात. मात्र याच वेळेस एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

शिवाय काही मुले गटारांच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूने चालत जात असल्याने रस्त्यांवरील वाहनांमुळे याठिकाणी अपघात होण्याची भीतीदेखील पालकांना आहे. त्यामुळे पालिकेने संबंधित कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करत ही रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.