करोना प्रतिबंधात्मक नियम व उपाययोजनांचे (एसओपी) सक्तीचे पालन करत राज्यातील व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी केले. प्रतिबंधित परिसराबाहेरील व्यायामशाळांना ही मुभा देण्यात आल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

करोना टाळेबंदी लागू झाल्यापासून राज्यात व्यायामशाळा बंद आहेत. राज्यातील टाळेबंदी गेले काही महिने टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहे. त्यामुळे व्यायामशाळा, फिटनेस सेंटर्स सुरू करण्यास परवानगी देण्याची या चालकांची मागणी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यायामशाळा चालकांच्या प्रतिनिधींशी नुकतीच चर्चा केली. दसऱ्यापासून व्यायामशाळा, फिटनेस सेंटर सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी दिले. त्यानुसार यासंबंधीचे आदेश शुक्रवारी मुख्य सचिव संजय कुमार यांनी जारी केले.

आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करणे बंधनकारक आहे.