26 October 2020

News Flash

व्यायामशाळा दसऱ्यापासून..

मुख्यमंत्र्यांची परवानगी, नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्र्यांची परवानगी, नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन करून दसऱ्यापासून म्हणजेच २५ आक्टोबरपासून राज्यातील व्यायामशाळा (जिम, फिटनेस सेंटर्स) सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी परवानगी दिली.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी व्यायामशाळा चालकांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीत त्यांनी व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. पण स्टीम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार करोना प्रतिबंधाबाबतच्या नियमावलीनुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत ८५० तर राज्यात सुमारे ५ हजार व्यायामशाळा आहेत. या व्यवसायावर ५० हजार लोक अवलंबून आहेत. लाखो रुपयांचे भाडे, वीजबिल द्यावे लागत आहे. कर्जाचे हप्ते चुकवणे कठीण झाले आहे. उपकरणे जप्त करण्याचा इशारा बँका आणि देणेकरी देत आहेत, अशी व्यथा व्यायामशाळाचालकांनी बैठकीत मांडली.

व्यायामशाळा आरोग्यासाठी असल्या तरी तेथून करोना संसर्ग वाढू नये याची दक्षता घ्यावी लागेल. त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. आता रुग्णसंख्या कमी आहे, परंतु युरोपातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही राहावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफीलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नियमावलीचे पालन करण्याची जबाबदारी व्यायामशाळांच्या मालकांवर आहे. त्या बाबतीत ढिसाळपणा केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया आदी उपस्थित होते.

नियमावली काय?

* व्यायामशाळा सदस्यांना संपूर्ण नियमावलीची माहिती द्यावी.

* व्यायामशाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे.

* प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी.

* शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टींबरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे.

* व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे, उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.

* दररोज रात्री व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

* सामूहिक व्यायाम प्रकार झुम्बा, स्टीम, सौना बाथ बंद राहणार.

व्यायामशाळा नागरिकांच्या आरोग्यासाठीच आहेत, परंतु तेथून करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घ्या. नियमावलीचे काटेकोर पालन करा.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 4:00 am

Web Title: gyms fitness centres in maharashtra to reopen from dussehra zws 70
Next Stories
1 भानु अथय्यांचा चित्रप्रवास शोधणारा लिलाव
2 निवृत्त पोलीस अधिकारी टी. के. चौधरी यांचे निधन
3 मेट्रो उद्यापासून सेवेसाठी सज्ज
Just Now!
X