पाठीवर अ‍ॅकॉस्टिक गिटार, छोटा स्पिकर आणि हातात कपडे ठेवण्याची पेटी.. बस्स इतकाच त्याचा संसार घेऊन जहांगिर कला दालनाच्या पायरीवर, एखाद्या इराणी उपाहारगृहाच्या समोर किंवा अगदीच फुटपाथवर बसून गुंग होऊन गिटार वाजवत इंग्रजी गाणे गाणारा २७ वर्षांचा एक परदेशी चेहरा दिसला तर तो कुणी साधारण पोट भरण्यासाठी गाणे गाणारा नसून तो ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध गायक सॉमरसेट बर्नाड आहे.
संगीत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जगभर भटकणारा हा संगीतातील ‘जिप्सी’ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्य़ांमध्ये फिरला आहे. नाशिक, औरंगाबाद, जुन्नर, रायगड अशा वेगवेगळ्या जिल्ह्य़ांमध्ये फिरण्याचा अनुभव समृद्ध करणारा आहे असे तो सांगतो. फक्त महाराष्ट्रच नाही तर वेगवेगळ्या देशांमध्ये अगदी फ्रान्स, स्पेन, आफ्रिका, अमेरिका, क्युबा अशा अनेक देशांमध्ये फिरत त्याने कित्येक संगीत प्रेमींना आपलेसे केले आहे. गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन करायचे. लोकांना गाणं आवडल्यावर त्यांनी दिलेल्या पैशातून रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटतो असे तो आनंदाने सांगतो. संगीत लोकांपर्यंत पोहोचवणे हाच त्याच्या आयुष्याचा ध्यास आहे. जिथे जागा मिळेल तिथे बसून गाणे सुरू करायचे. मोठय़ा सभागृहात किंवा कॉन्सर्टमध्ये गायलेले संगीत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. बऱ्याचदा असे संगीत कार्यक्रम अतिशय खर्चीक व सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नसतात. मात्र रस्त्यावर बसून संगीत लोकांच्या मनात थेट पोहोचते. बऱ्याचदा माझी भाषा न समजणारे लोकदेखील तासन्तास माझे गाणे ऐकत असतात. तेव्हा हेच जाणवते की ‘संगीताला भाषा नसते, संगीताला भाषा, देश ,धर्म, पैसा कसलीच मर्यादा नसते.’ ग्रामीण भागातील अनुभव ‘जगणे’ शिकवणारा आहे. माझी भाषा या ग्रामीण भागातील लोकांना कळत नसूनही कधीच भाषेचा अडसर जाणवला नाही असा त्याचा अनुभव आहे. चारवर्षांपूर्वी जेव्हा घर सोडले तेव्हा आईने खूप विरोध केला होता. मात्र बाबा नेहमीच पाठीशी होते. जे आपल्याला शक्य झाले नाही ते आपला मुलगा करतो आहे याचेच त्यांना समाधान होते. कोणाच्या तरी दबावाखाली राहून काम करणे शक्य नव्हते. रोजच्या कामाच्या रगाडय़ात सर्जनशीलता गमावून बसतो आहे हे जाणवल्यावर मी माझ्या आनंदाचा पाठीराखा झालो, असे तो सांगत होता. लहानपणापासून संगीताचे वेड असल्याने त्यासाठीच काहीतरी करण्याचा ध्यास घेऊन त्याने प्रवासाला सुरुवात केली. आज कदाचित माझ्याकडे पैसा नसेल, माझ्या इतर मित्रांप्रमाणे बँकेत सेिव्हग किंवा स्वत:चे घरही नसेल मात्र माझ्याकडे समाधान आहे. संगीतासाठी जिप्सीसारखे फिरताना मी माणसे ओळखायला शिकलो याचा मला आनंद आहे, असे तो अभिमानाने सांगतो. या प्रवासात कित्येक चांगले मित्रही भेटले ज्यांचा मदतीचा हात वेळोवेळी सोबत होता. याशिवाय वेगवेगळ्या देशातील संगीतावर प्रेम करणाऱ्या संगीतकारांसोबतही गाण्याची संधी मिळाली. मुख्यत: या प्रवासामुळे सांस्कृतिक चौकट तोडता आली हे महत्त्वाचे. कित्येकदा पोलीस स्टेशनला ही जावे लागले. मात्र चांगले वाईट क्षण हा अनुभवाचा भाग असल्याने हे सर्व खूप सकारात्मकतेने घेत असल्याचे सॉमरसेटने उत्सुकतेने सांगितले.