राज्यातील वेगवेगळ्या विभागांकडून वेगवेगळ्या दरांनी होणाऱ्या औषध खरेदीमुळे निर्माण होणारा गोंधळ व घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी ‘हाफकिन बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड’च्या माध्यमातून सर्व औषधे व उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय शासनाने ऑगस्टमध्ये घेऊनही वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेल्या औषध खरेदीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज (बुधवारी) प्रथमच  हाफकिनच्या ‘औषध खरेदी समिती’ची बैठक होत असून त्यात वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागासाठी सुमारे ८० कोटी रुपयांच्या औषध खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता मिळणार आहे.

राज्यात आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विभागाला आवश्यक असणाऱ्या औषधांची खरेदी ही वेगवेगळ्या दरकरारांनुसार गेली अनेक वर्षे होत होती. यातून एकाच औषधासाठी विविध विभागांक डून वेगवेगळे दर पुरवठादारांना दिले जात होते. त्यातच औषध व उपकरणांच्या खरेदीत घोटाळे होत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढू लागल्यामुळे सर्व विभागांसाठीची औषध खरेदी ही ‘हाफकिन बायोफार्मा’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. याबाबतचे आदेश काढूनही ‘औषध खरेदी समिती’च्या स्थापनेपासून वेगवेगळ्या कारणांसाठी गेले तीन महिने खरेदीचे कामच सुरू होऊ शकले नाही. परिणामी राज्यातील सोळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये औषधाअभावी रुग्णांची परवड होण्यास सुरुवात झाली.अखेर ‘हाफकिन बायोफार्मा’ने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी १७ सदस्यांची ‘औषध खरेदी समिती’ स्थापन केली. मात्र औषध खरेदीसाठी तयार केलेल्या नियमावलीनुसार संबंधित विभागाने त्यांना लागणाऱ्या औषधांची व एकूण पुरवठय़ाची माहिती देणे आणि त्यासाठी लागणारी रक्कम ‘हाफकिन बायोफार्मा’कडे जमा करणे बंधनकारक होते. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे औषधे व उपकरणांच्या खरेदीसाठी लागणारा सुमारे १३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे खरेदी कशाच्या आधारे करायची असा प्रश्न निर्माण झाला होता. तथापि वैद्यकीय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात तीस कोटी रुपयांच्या औषध खरेदीचे प्रस्ताव सादर केले असून हमीपत्राच्या आधारे खरेदीला मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे. आरोग्य विभागानेही सुमारे ७५ कोटी रुपयांच्या औषध खरेदीचे प्रस्ताव सादर केले असून त्यासाठी आवश्यक असणारी रक्कम खरेदीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • हाफकिनची औषध खरेदी समिती स्थापन होण्यास विलंब लागत असल्यामुळे जुन्या पद्धतीनुसार आरोग्य विभागाने आवश्यक असणारी औषध खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर हाफकिनच्या औषध खरेदी समितीची स्थापना झाल्यामुळे अंतिम निर्णयासाठी आरोग्य विभागाचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून उद्या हाफकिनमध्ये खरेदी समितीच्या प्रमुख सीमा व्यास यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची पहिली बैठक होणार असून त्यात या औषध खरेदीला मान्यता देण्यात दिली जाणार आहे.