उच्च दरातील औषधे वाजवी दरात उपलब्ध करुन देणाऱ्या हाफकिन या जीवरक्षण औषध महामंडळाकडून मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत दिली. याचबरोबर महामंडळाला २०१४-१५ या वर्षांत नफा झाल्यामुळे महामंडळाने राज्यशासनाला एक कोटी चार लाख सत्तेचाळीस हजार नऊशे वीस रुपयांचा लाभांशही दिला. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम करीत असून सामुदायिक सामाजिक उत्तरदायित्त्व यामाध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या दुष्काळग्रस्त निधीअंतर्गत ही मदत देण्यात आली आहे. वरील दोन्ही रक्कमेचा धनादेश महामंडळाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मंगळवार ८ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, राज्यमंत्री विद्या ठाकूर आणि अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.

जीवरक्षण औषधांची उत्पादक प्रक्रिया वाढवणे आणि देशभरातील जीवरक्षण औषधांच्या मागणीचा पुरवठा करणे हे या महामंडळाचे मुख्य काम असून महामंडळाने १९७५ पासून उत्कृष्ट दर्जाच्या पोलिओ लसींचा भारत सरकारला पुरवठा करुन पोलिओ निर्मुलनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. याबरोबरच पंचगुणी लस निर्मितीचा प्रकल्प हाफकिन महामंडळाने हाती घेतला असून त्याबाबत प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे.