राज्य सरकारने आता अनेक व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी सलून व्यवसाय सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. सलून व्यवासाय सुरु करण्याची मागणी नाभिक समाजाच्या व्यावसायिकांनी केली आहे. एकीकडे यावरुन आता राज्यभरात नाभिक समाजाकडून निषेध व्यक्त केला जात असतानाच मुंबईमध्ये मात्र एक व्यक्ती रस्त्यावर राहणाऱ्या गरीब मुलांना मोफत हेअरकट करुन देत आहे. यासंदर्भात वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

या व्यक्तीचे नाव रविंद्र बिरारी असं आहे. रविंद्र हे टिटवाळ्याला राहतात. मात्र त्यांचे सलून भांडूपमध्ये आहे. आठवड्यातून एक दिवस ते रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना मोफत केस कापून देतात. या अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण समाजातील काही घटकांची सेवा करत असल्याचा आनंद आहे असं रविंद्र सांगतात.

“दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून सलून बंद आहेत. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांकडे केस कापण्यासाठी काहीच पर्याय उपलब्ध नाहीय. ही मूल केसं कापण्यासाठी कुठेच जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा मुलांना मदत करण्याच्या हेतूने मी त्यांना मोफत हेअरकट करुन देतो,” असं रविंद्र यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

“हे काका खूप चांगले आहेत. लॉकडाउन सुरु झाल्यापासून रस्त्यावर फिरणारा एकही नाभिक आमच्या परिसरामध्ये आला नाही. मात्र हे काका येतात आणि आम्हाला मोफत हेअरकट करुन देताता,” असं येथील मुलं रविंद्र यांच्याबद्दल बोलताना सांगतात. रविंद्र यांनी करोना साथीच्या काळातही मुंबईकरांच्या जिद्दीचे आणि समाजसेवेचे दर्शन घडवलं आहे.

नाभिक समाजाची आंदोलने

लॉकडाउनचे नियम शिथिल करत अनेक उद्योग व्यवसायांना परवानगी देण्यात आली असली तरी सलून व्यवसाय सुरु करण्यात परवानगी देण्यात आलेली नाही. ती त्वरीत द्यावी आणि नाभिक समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी राज्यभरात नाभिक समाजाकडून आंदोलन केली जात आहेत. इतर व्यवासायांना ज्याप्रमाणे नवीन नियम लावण्यात आले आहेत तसे नियम लावून काम करण्याची तयारी नाभिक समाजाने दर्शवली आहे. मात्र अद्याप यासंदर्भात सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सलून कधी सुरु होणार या प्रश्नाचे उत्तर अद्यापही सामान्यांना मिळालेलं नाही.