देशभरातील प्रवाशांना रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी दरवाढीचा दणका दिला असला तरी त्याचा सर्वाधिक फटका दररोज किमान ६० ते ८० किमी सरासरी प्रवास करणाऱ्या मुंबईतील उपनगरी प्रवाशांनाच बसणार आहे. केवळ दोन पैसे प्रतिकिमी वाढ केल्याचा रेल्वेमंत्र्यांचा  दावा असला तरी प्रत्यक्षात सुसूत्रीकरणाच्या नावाखाली छुपी दरवाढ लादली जाणार आहे. दरवाढीतून मिळणाऱ्या ६६०० कोटी रुपयांपैकी तब्बल तीन ते साडेतीन हजार कोटी म्हणजे ५० टक्क्यांहून अधिक उत्पन्न मुंबईकर प्रवाशांकडून रेल्वेला मिळणार आहे. मुंबईकर प्रवाशांना सुविधा पुरविण्यात रेल्वेप्रशासनाची बेपर्वा वृत्ती असताना उत्पन्न मिळविण्यासाठी मात्र ‘सोन्याची कोंबडी’ म्हणून त्यांचा वापर केला जात आहे.
रेल्वेमंत्र्यांनी लांब पल्ल्याच्या प्रवासाबरोबरच उपनगरी प्रवासाच्या दरातही वाढ केली आहे. उपनगरी प्रवाशांवर १ जानेवारीपासून अधिभार लादल्याने तिकीट व पासाचे दर वाढले होते. सेवाशुल्क, विकास शुल्क, अधिभार यांचा बोजा असताना प्रवास भाडय़ातील वाढीतून उपनगरी प्रवाशांना वगळणे आवश्यक होते. देशातील सुमारे एक कोटी पाच लाख उपनगरी प्रवाशांपैकी ७२ लाखाहून अधिक प्रवासी मुंबईतील आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण मुंबईत नगण्य असल्याने उपनगरी प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ८५ टक्क्य़ांहून अधिक वाटा मुंबईकर प्रवासी उचलतात. मुंबईत गर्दीच्या वेळी १२ डब्यांच्या गाडीतून तीन-साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. आसनक्षमतेच्या तिपटीहून अधिक प्रवाशांची संख्या असल्याने कोलकाता आणि चेन्नईच्या तुलनेत मुंबईतील उपनगरी सेवा फायद्यात आहे. तरीही मुंबईकर प्रवाशांच्या सेवासुविधांसाठी गेल्या वर्षी केवळ ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यासाठी किमान एक हजार कोटी रूपये मिळावेत, अशी मागणी करण्यात आली होती. पण प्रवाशांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आल्याचे माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
ओव्हरहेड वायर्स, रेल्वेरूळ, सिग्नल यंत्रणा आदींची देखभाल करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने त्याचा फटका मात्र उपनगरी प्रवाशांना नेहमीच बसत असतो. एमयूटीपी अंतर्गत येणारे प्रकल्प निधीअभावी काही वर्षे रेंगाळले आहेत. काही स्थानकांवर सरकते जिने उभारण्याचे आश्वासन गेले एक-दीड वर्ष दिले जात असले तरी स्थानकांवरील प्रचंड गर्दी लक्षात घेता हे जिने किती काळ सुरू राहतील, याविषयी शंका आहे. उपनगरी स्थानकांवर स्वच्छ पिण्याचे पाणी, सुव्यवस्थित स्वच्छतागृहे या किमान सुविधाही पुरविल्या जात नाहीत.
प्रति किमी केवळ दोन पैसे दरवाढ केल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात सुसूत्रीकरण करत असताना तिकीट व पासाचे दर एक रुपयाच्या पटीत वाढविण्यात येत असल्याने छुपी दरवाढ लादली जाणार आहे. प्रवास भाडय़ात गेली अनेक वर्षे वाढ न केल्याचे कारण दिले असले तरी वेगवेगळ्या शुल्क व अधिभाराच्या नावाखाली तिकीट व पासाचे दर वाढविण्यात आलेले आहेत. या दरवाढीचा फटका बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांपेक्षा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक बसणार आहे. मुंबईकर खासदार उपनगरी रेल्वेप्रवाशांच्या समस्यांबाबत कायम उदासीन असतात. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना केवळ प्रवास दरवाढीला तोंड द्यावे लागत आहे.
उपनगरी रेल्वेप्रवाशांची संख्या
मुंबई-७२ लाख
कोलकत्ता-२१ लाख
चेन्नई-११ लाख