डॉ. हमीद दाभोलकर यांची मागणी

चिथावणीखोर भाषणे किंवा हिंसाचाराला उद्युक्त केल्याबद्दल झाकिर नाईक यांची सध्या चौकशी करण्यात येत आहे त्याच धर्तीवर बॉम्बस्फोट किंवा हत्या यामध्ये ‘सनातन’ संस्थेचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने या संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉ. हमीद दाभोलकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी असल्याची टीकाही त्यांनी केली.

नाईक यांच्या संस्थेने हिंसाचाराला चिथावणी दिली असल्यास या संस्थेची किंवा नाईक यांची चौकशी होणे आवश्यकच आहे. अशा संस्थांच्या विरोधात सरकारने कडक कारवाई केली पाहिजे.

देशविघातक कारवाया करणाऱ्या संस्थांच्या विरोधात कारवाई व्हावी याबाबत कोणाचचे दुमत नाही. पण त्याच वेळी डॉ. दाभोळकर यांची हत्या तसेच विविध ठिकाणी बॉम्बस्फोटात सनातन संस्थेचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्येतही ‘सनातन’च्या कार्यकर्त्यांच्या

विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर ‘सनातन’ संस्थेचे प्रमुख डॉ. आठवले यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली. आठवले यांचे व्यक्तिमत्व गुढ असल्याचा आक्षेप अनेक संस्थांनी यापूर्वीच घेतला आहे.

न्यायालयीन रेटय़ामुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी केंद्रीय  गुप्तचर विभागाने सनातनच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले  आहे. आधी आघाडी सरकारच्या काळात तपासात काही छडा लागला नव्हता, नंतर या सरकारच्या काळात फारसे निष्पन्न झाले नव्हते. उच्च न्यायालयाने दखल घेतल्याने सारी सूत्रे फिरली, असेही डॉ. दाभोलकर यांनी सांगितले.