News Flash

लोअर परळ पुलावर लवकरच हातोडा 

लोअर परळ उड्डाणपूल पाडून त्या जागी नवीन उड्डाणपूल बांधला जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम रेल्वेकडून निर्णयावर शिक्कामोर्तब 

धोकादायक असलेला लोअर परळ उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. हा पूल पाडण्याकरिता तीन महिने लागणार आहेत. त्या दरम्यान नवीन पुलाबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून करण्यात आली.

३ जुलै २०१८ रोजी अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका कोसळून अपघात झाला होता. यामुळे दोन जणांना प्राण गमवावे लागले. तर तीन जण जखमी झाले. तसेच लोकल सेवाही मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली. यानंतर रेल्वे, पालिका व आयआयटीने उड्डाणपुलांच्या केलेल्या सुरक्षा तपासणीत लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक घोषित केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी व पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. पूल बंद होताच परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

लोअर परळ उड्डाणपूल पाडून त्या जागी नवीन उड्डाणपूल बांधला जाणार आहे. पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेने त्याचे काम खासगी कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत निविदा उघडण्याची अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी सांगितले. मात्र याबाबत सविस्तर माहिती नंतर देण्यात येईल, असे मिश्रा म्हणाले. पूल पाडण्यासाठी तीन महिने लागतील.

साधारणपणे हँकॉक पुलाप्रमाणेच त्याचे काम चालेल. लोअर परळ उड्डाणपूल पाडण्यासाठी लागणारा कालावधी पाहता तोपर्यंत बांधणीचा निर्णयदेखील होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मुंबई पालिकेने पूल बांधावा, अशी मागणी केली असून पालिकेकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याचे ते म्हणाले.

पूल पाडकामाला दोन ते तीन दिवसांत सुरुवात

लोअर परळ उड्डाणपुलाचा मधला भाग हा पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतो. हा भाग पाडण्यात येणार आहे. या पाडकामासाठी काढण्यात आलेल्या निविदेला तीन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. यापैकी एका कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे. पूल पाडकामासाठी ७.२ कोटी रुपयांचा खर्च येईल. पूल पाडकामातील किरकोळ कामांना दोन ते तीन दिवसांत सुरुवात करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यातील महत्त्वाची कामे करण्यासाठी ब्लॉक घ्यावे लागतील. तसेच मुंबई पालिकेशीही चर्चा करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 3:02 am

Web Title: hammer at lower parel bridge soon
Next Stories
1 रेल्वेचे संगणकीय आरक्षण केंद्र पावणेतीन तास बंद राहणार
2 ‘बाळ पेंग्विन’ला पाहण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड
3 वैभव राऊतसह तिघे आज न्यायालयापुढे
Just Now!
X